नाशिक – शहरासह जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर होत आहे. भाजीपाल्याचे दर कडाडले असून पावशेर भाजीसाठी ग्राहकांना ४० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे महिलांचे महिन्याचे स्वयंपाकघरातील अंदाजपत्रक कोलमडले आहे.
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून पावसाने ठिय्या दिला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातच भाजीपाला सडू लागला असून पाऊस असाच सुरु राहिल्यास भाज्यांचे दर अधिक वाढण्याची शक्यता विक्रेते किरण भालेराव यांनी व्यक्त केली. सततच्या पावसामुळे शेतात पाणी असल्याने भाजी काढणे अशक्य होत आहे. चिखलाने भरलेला भाजीपाला स्वच्छ करुन बाजारपेठेत आणण्यासाठी जाणारा वेळ तसेच वाहनातून बाजारपेठेपर्यंत भाजीपाला येण्यास वेळ लागत आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झालेले असल्याने आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. भाज्यांचे दर यामुळे कडाडले आहेत. ग्राहकांकडून वेगवेगळ्या भाज्यांची विचारणा होते. ग्राहकांकडून अधिक दिवस टिकणाऱ्या पत्ता कोबी, गवार अशा काही भाज्यांची मागणी होत आहे. सध्या आषाढामुळे नैवेद्यासाठी मेथीच्या भाजीला मागणी आहे. मात्र दर ५० रुपये जुडी असे आहेत. पावसाने उघडीप घेतल्यास वाढलेले दर काही प्रमाणात कमी होऊ शकतील.
भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर
बटाटे – ४० रुपये किलो, हिरव्या मिरच्या २०-३० रुपये पावशेर, लसुण गावठी १२० रुपये पावशेर, आले २० रुपये पावशेर, गिलके ४० रुपये, दोडके ४०, कारले ४० , गवार ४०-६०, वाल ४०, पापडी वाल ६० , फरसबी ४०, तोंडली ३०, ढेमसे ३०, वांगे जांभळे- ४०, भरीत वांगे ३० रुपये पावशेर, मेथी ४०-५० रुपये जुडी, पालक – ३०, तांदुळका ३०, शेपु – ३०-४०, शेवग्याच्या शेंगा ३० हून अधिक, डांगर २०, भोपळा ४० रुपये नग, बीट १० रुपये नग, पत्ता कोबी ३० ते ५० रुपये गड्डा, फ्लाॅवर ४० रुपये नग
महिन्याचे अंदाजपत्रक कोलमडले
सतत पडणाऱ्या पावसामुळे भाजीबाजारात जाऊन भाजी घेणे होत नाही. अशा स्थितीत फिरत्या विक्रेत्यांकडून भाजी घेतली तर ते अधिक दराने विकतात. भाजी बाजारातही हे दर ४० रुपयांपुढे आहेत.पावशेर भाजी पुरत नाही. मुलांचे डबे, घरातील अन्य लोकांचे पथ्यपाणी सांभाळत वेगवेगळ्या भाज्या लागतात. कडधान्य , डाळी यावर भिस्त असली तरी भाज्यांचे वाढते दर महिन्याचे अंदाजपत्रक बिघडवत आहे. – निर्जला देशपांडे (नोकरदार)