नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन,वर्ग चार कर्मचारी संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकऱ्यांनी ईदगाह मैदानावर ठिय्या दिला. गुरुवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. या कालावधीत तीन महिलांना भोवळ आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संघटनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्यावर काही मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांबाबत चर्चा केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पूजा जाधव, कविता डांगे यांना चक्कर आली. पोलिसांनी तातडीने दोघींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. काही वेळानंतर आंदोलनकर्त्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयाकडे कूच केले. कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलकांना आतमध्ये जाऊ न दिल्याने त्यांनी आदिवासी भवनासमोर ठिय्या दिला. त्याठिकाणी एका महिलेला भोवळ आली. प्रशासनापैकी कोणी आंदोलकांच्या मदतीला आले नाही. शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन आणि वर्ग चार यांच्या वतीने आश्रमशाळेतील शिक्षकांची १७९१ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याच्या इ- निविदेस प्रशासकीय मान्यता देण्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत याच पध्दतीने निदर्शने सुरू राहतील. पुढील दोन ते तीन दिवसात याविषयी निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आंदोलनस्थळी स्वच्छतागृहाची व्यवस्था असली तरी पिण्याचे पाणी, महिलांच्या अनुषंगाने या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी आहेत. काही आदिवासी संघटनांच्या वतीने आंदोलनकर्त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था झाली असली तरी पोटाची भूक भर पावसात शमवायची कशी, हा प्रश्न आंदोलकांपुढे आहे.