नाशिक : मराठा आरक्षणासाठी ४७ दिवसांपासून येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात झाले आहे. राजकीय नेत्यांचा कार्यक्रमांना विरोध केला जात असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजाती सुरक्षा मंचच्यावतीने मोर्चा व मेळावा पार पडला. या प्रकारे मंत्री वा लोकप्रतिनिधींनी कार्यक्रम घेऊन आमचा अंत पाहू नये. या संदर्भात आरोग्य राज्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला कल्पना देऊन पुढील काळात शहर व जिल्ह्यात कार्यक्रम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षणासाठी सोमवारी सायंकाळी मशाल फेरी काढण्यात येणार आहे.

जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे उपोषण सुरू आहे. नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले. जिल्ह्यात ५५० हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाने विरोध केल्याने सार्वजनिक वाचनालय नाशिकने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण सोहळा स्थगित केला आहे. या घटनाक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जनजाती सुरक्षा मंचच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्यास मराठा उपोषणकर्त्यांनी आक्षेप नोंदविला. शहर व ग्रामीण भागात कुठल्याही खासदार, आमदार व मंत्र्याने कार्यक्रम घेऊ नये. आमच्या जखमेवर मीठ चोळून अंत बघू नये. या भावना मराठा बांधवांनी आरोग्य राज्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकासमोर मांडल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.

हेही वाचा : नाशिक : वाहनातून मद्याची अवैध वाहतूक; ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी शिवस्मारक उपोषण स्थळापासून मराठा आरक्षणासाठी मशाल, टेम्बा फेरी काढण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण भागातील महिला व मुली व विद्यार्थ्यांनी या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाती कदम यांनी केले. दुगाव चौफुलीवर सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. शिक्षण व रोजगार हा मराठा समाजाचा मूलभूत हक्क असून सरकार अंत बघत आहे. आम्ही सरकार व नेत्यांविरोधात असहकार पुकारला असून तो आरक्षण मिळेपर्यंत कायम असेल असे सांगत गावबंदी करण्यात आली आहे.