नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणाची जबाबदारी पोलिसांसमवेत नाशिकमधील पाच हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सांभाळणार आहेत. संबंधितांना त्यासंदर्भात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी चर्चा केली असून संबंधित विद्यार्थ्यांना श्रेणी किंवा विशेष गुण मिळतील याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दी, चेंगराचेंगरी या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात नाशिक पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणाचे आव्हान आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी मुबलक कुशल मनुष्यबळ निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी विविध स्तरावर काम केले जात असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून प्रशिक्षित स्वयंसेवक तयार करण्यात येणार आहे. पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी नाशिक शहर पोलिसांनी सुरू केली आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता, विद्यार्थ्यांचे कौशल्य, त्यांची आवड लक्षात घेत त्यांना स्वयंसेवा, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, चेंगराचेंगरी, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी चर्चा करुन कार्यक्रमास अंतिम रुप देण्यात आले आहे.
नाशिक शहर तसेच शहराजवळील महाविद्यालयांशी यासंदर्भात संपर्क साधण्यात आला असून वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडे वाहतूक, वैद्यकीय, मदत कक्ष, स्वयंसेवा, आपत्ती तसेच गर्दी व्यवस्थापन, नियंत्रण कक्षात काम अशा विविध जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. महाविद्यालयीन वेळेतच या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलीस ठाणे किंवा कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वयंसेवेसाठी विद्यापीठाच्या वतीने श्रेणी किंवा गुण दिले जाणार आहेत.
नाशिकमधून पाच हजार विद्यार्थ्यांची कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना ओळखपत्र दिले जाईल. या कामासाठी पालकांचीही संमती घेण्यात येणार आहे. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांशी चर्चा झाली असून विद्यार्थ्यांना श्रेणी किंवा गुण दिले जाणार आहेत. या शैक्षणिक वर्षापासून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. -संदीप मिटके (सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक)