लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: जिल्ह्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागालगत असलेल्या जंगलांमध्ये पुन्हा लाकूड चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या जंगलातील खैरांवर सर्रासपणे कटर फिरवित असल्याने वनविभागही सतर्क झाला आहे. नाशिक वनविभागाने या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त वाढविली आहे. दोन दिवसांत सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात खैराची तस्करी राेखण्यास पथकाला यश आले आहे. दोन संशयित चोरटेही वनपथकाच्या हाती लागले आहेत.

बाऱ्हे वनपरिक्षेत्रातील ठाणगाव, उंबरणे, खिर्डी या आदिवासी गावांमधून खैराची लाकडे वाहून नेली जाणार असल्याची माहिती बाऱ्हे वनपथकाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर यांनी त्वरित उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांना माहिती कळविली. त्यांनी पथक सज्ज करीत सापळा रचण्याची सूचना केली. त्यानुसार वनपाल आणि वनरक्षकांचा समावेश असलेली दोन पथके रवाना करण्यात आली. या पथकांनी बुधवारी मध्यरात्री रात्री सापळा रचला.

सविस्तर वाचा… जळगावात डेंग्यूने तरुणाचा मृत्यू; तीन मुले बाधित

संशयास्पद जीपचा पाठलाग करताना अंधारात जीप जंगलाच्या एका आडवळणाच्या रस्त्यावर सोडून संशयित पसार झाले. पथकाने जीप जप्त केली. या जीपमधून सुमारे पाच हजार रुपयांचे खैराचे ३७ नग हस्तगत करण्यात आले. जीपचा मालक संशयित योगेश झांजर (२७, रा.सातपाडा, ता.सुरगाणा) तसेच पाठीमागे दुचाकीवर असलेला साथीदार संशयित चंदर काकरडे (४०, रा.खोगळा, ता.सुरगाणा) यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची दुचाकी जप्त केली. त्याच्याविरुद्ध वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना दिंडोरी तालुका न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची वनकोठडी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खैर नेणारे वाहन जप्त

गुजरातमधील तस्करांच्या टोळ्यांची सुरगाणा तालुक्यातील खैराच्या जंगलावर कायमच वक्रदृष्टी राहिली आहे. शुक्रवारनंतर पावसाने उघडीप देताच चोरट्यांनी जंगलात कापून ठेवलेल्या मालाची वाहतूक सुरू केली होती; मात्र वनपथकाच्या सतर्कतेने त्यांचे डाव हाणून पाडले गेले. बुधवारी पहाटे बाऱ्हे वन पथकाने मोटारदेखील पथकाने रोखली होती. ते वाहन जप्त करण्यात आले .