लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातील मुंबईनाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती कांस्य धातूच्या शिल्पाचे लोकार्पण शनिवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर मराठा समाजातील मुलांसाठी वसतिगृह व सारथी संस्थेच्या विभागीय कार्यालयाचे भूमिपूजन, गंगापूर रस्त्यावरील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणाऱ्या स्मृती उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी लोकार्पण, विविध विकास कामांचे भूमिपूजन आदी भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन सत्ताधारी पक्षांनी केले आहे. अन्न, नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबईनाका येथील सावित्रीबाई फुले चौकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील शिल्पाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित राहणार आहेत. महामार्ग बस स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत हा कार्यक्रम होईल. पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलरोधक तंबू उभारण्यात आला आहे.

आणखी वाचा-नंदुरबार : मालगाडी घसरल्याची बातमी अन…

वाहतूक सुरळीत होणार

मुंबई नाका परिसरात वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, यादृष्टीने प्रकल्पाचे संकल्पचित्र बनविण्यात आले. मंत्री भुजबळ यांनी मनपा आयुक्तासमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या. वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने या बेटाचा आकार कमी करण्यात आला. वाहतुकीसाठी मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली. याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता ती सुरळीत होण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा केला जात आहे.

स्मारकाची वैशिष्ट्ये

कुडाळ येथील प्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ यांच्याकडून अर्धाकृती कांस्य धातूचे शिल्प तयार करण्यात आले. या शिल्पांसाठी भव्य असा चौथरा उभा करण्यासाठी राजस्थान येथून ग्रेनाईट मार्बलचा वापर करण्यात येऊन राजस्थानी कारागिरांनी ही वास्तू घडवली. महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची १८ फूट तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची १६.५० फूट इतकी आहे. स्मारकातील विद्युत रोषणाईचा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, अशी विशेष प्रकाश योजना या ठिकाणी करण्यात आली आहे. सुसज्ज वाहतूक बेट, पाण्याचे कारंजे निर्माण करून सर्व स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

आणखी वाचा-नाशिक : बोरगावात रुग्णवाहिकेसाठी आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसतिगृह, सारथीच्या विभागीय कार्यालयाचे भूमिपूजन

मराठा समाजातील ५०० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. वसतिगृहासाठी आ. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला होता. त्र्यंबक रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सारथी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकी ५०० मुले व मुली यांच्यासाठी वसतिगृह बांधण्याचे काम मंजूर झाले. या वसतिगृहामुळे शिक्षणासाठी शहरात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले. या ठिकाणी अभ्यासिका, सारथीच्या विभागीय कार्यालयासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सीसी टीव्ही कॅमेरे आदींचा अंतर्भाव आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व सभागृह, वनभवन, महिला रुग्णालयाचा दुसरा टप्पा, महामार्गावरील इंदिरानगर येथील भुयारी मार्गाचे विस्तारीकरण आदी कामांचे भूमिपूजनही होणार आहे.