नाशिक : दुबई येथे रविवारी रात्री भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतंर्गत सामना होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानात समारोसमोर येत असताना भारतात काही राजकीय पक्षांनी या सामन्याविरोधात भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर (कुंकू) निषेधार्थ पाठविण्याचे आंदोलन सुरु केले आहे. आम आदमी पक्षानेही विरोध केला आहे. त्यात आता ठाकरे गटाशी सलगी वाढलेल्या महाराष्ट्रनवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. मनसेशी संबंधित वाहतूक सेनेने नाशिकरोड परिसरात केलेले आंदोलन चर्चेचा विषय झाले आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई येथे परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी रात्री सामना रंगणार आहे. पहलगाम दहशतकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी कोणत्याच प्रकारचे संबंध ठेवू नयेत, अशी तीव्र भावना देशवासियांची आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे म्हणत जल करार रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आशिया चषकात पाकिस्तानविरुध्द खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला परवानगी दिली. देशभरात अनेक संघटना आणि विरोधकांकडून या सामन्याला कडाडून विरोध केला जात आहे. सरकारने पहलगाम हल्ल्यानंतरही सामन्याला परवानगी दिल्याने अनेक ठिकाणी निदर्शने आणि आंदोलने करण्यात येत आहेत.
शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या सामन्यावरुन गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर आरोप केला आहे. आम आदमी पक्ष आणि शिवसेनेने (उध्दव ठाकरे) जाहीरपणे पाकिस्तानविरुध्द भारताने क्रिकेट खेळू नये, अशी भूमिका मांडली आहे. आशिया चषकातील सामना अजूनही भारताने रद्द करावा, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, या घोषणेचे आता काय झाले, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, काही माजी क्रिकेटपटूंनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमिवर, नाशिक रोड येथील उपनगर परिसरात मनसेशी संबंधित वाहतूक सेनेने एक वेगळेच आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला आहे. वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सहाने यांच्या नेतृत्वाखाली उपनगर येथे चक्क टीव्ही फोडो आंदोलन करण्यात आले. टीव्ही फोडून सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहर चिटणीस अभिषेक गुरव, विभाग उपाध्यक्ष राहुल पाटील, प्रकाश बोधवानी,अनिल देठे, विल्यम कॉक्स, अमोल गुरव, अनिल गांगुर्डे, नाना सहाणे, प्रथम पाटील, कृष्णा बरके, ललित पागेरे, जतीन कोकणे आदी उपस्थित होते