नाशिक – जिल्ह्यात लवकरच एक मोठा प्रकल्प येणार असून त्यासाठी साडेसहाशे एकर जागा लागणार आहे. त्यापैकी ४०० एकर जागा संपादित करण्यात आली असून यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रकल्पाचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. जिल्ह्यातील राजूर बहुला येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संपादित केलेल्या जागेपैकी २५ एकर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून द्यावी, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे, असे निर्देशही सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी दुपारी मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीचा नाशिक विभागाचा आढावा आणि जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडी-अडचणीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मंत्री सामंत यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष आशिष नहार, अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आयमा) अध्यक्ष ललित बूब, महाराष्ट्र चेंबर्सचे सचिन शहा, मिलिंद राजपूत, धनंजय बेळे, मनीष रावल, हर्षद बेळे, राजेंद्र वडनेरे, राजेंद्र आहिरे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
उद्योग मंत्री सामंत यांनी, नाशिकमधील आयटी पार्कच्या माध्यमातून विकासाला गती मिळणार असून त्यासाठी राजूर बहुला येथील २५ एकर क्षेत्रासह महानगरपालिका १५ एकर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आयटी कंपन्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने साधूग्रामसाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. तेथे उद्योजक, महानगरपालिकेच्या सहकार्याने कायमस्वरूपी प्रदर्शनी केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी केली. प्रदर्शनी केंद्रात ११ वर्षे औद्योगिक प्रदर्शने भरविण्यात येतील, तर १२ व्या वर्षी कुंभमेळ्यासाठी सदरची जागा प्रशासनाकडे सोपविण्यात येईल. तसेच कुंभमेळ्यानिमित्त देशभरातून येणाऱ्या उद्योजकांसाठी तंबू उभारणीचे निर्देश सामंत यांनी दिले.
अग्निशमन कराचा प्रश्न महानगरपालिका आणि एमआयडीसीच्या समन्वयातून मार्गी लावण्यात येईल. उद्योजकांना विनाव्यत्यय अखंड वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने उपाययोजना कराव्यात. उपकेंद्रांचे सक्षमीकरण करावे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा उद्योग समितीच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न सोडविले जातात. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा उद्योग समितीच्या अंतर्गत उप समित्यांची स्थापना केली असून या उपसमितीच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास गती मिळत आहे. याच धर्तीवर राज्यभरात कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
एमआयडीसीचा नाशिक विभागाचा आणि जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडी-अडचणीसंदर्भात आढावा बैठक नाशिक येथे घेण्यात आली. या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये आगामी काळात येणारे प्रकल्प, आयटी पार्कसाठी भूसंपादन, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने करावयाचे भूसंपादन यासंदर्भात चर्चा केली.