लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : वडाळा परिसरात मोटरचा वापर केला तरच नळाला पिण्याचे पाणी येते. त्यातही ते गढूळ असते. मोटारीचा वापर केल्यास प्रचंड वीज देयक येते. वडाळा परिसरात चिखलच चिखल आहे. या परिसराकडे महानगरपालिकेने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्थानिकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. वडाळा गाव परिसर मनपा क्षेत्रात येते की नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.

युवाशक्ती कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली वडाळा गावातील मेहबूबनगर, मुमताजनगर, मदिनानगर, सादिकनगर, म्हाडा इमारती, गुलशननगर भागातील समस्यांकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. आधी या भागात सकाळी पाणी पुरवठा केला जात होता. कुठलीही पूर्वसूचना न देता सकाळी येणारे पाणी बंद करून संध्याकाळी करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी, कामगारांची गैरसोय झाली. परिसरात पाण्याचा दाब अतिशय कमी आहे. मोटारीचा वापर केला तरच नळाला पाणी येते. त्यामुळे येणारी मोठी वीज देयके गरीब नागरिक कसे भरणार, असा प्रश्न करुन यावर उपाययोजना करावी आणि पाण्याची सकाळची वेळ पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली.

आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात बनावट विदेशी मद्याचा साठा ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडाळा गाव परिसरात चिखलाचे साम्राज्य असल्याने ये-जा करण्यासाठी स्थानिकांना कसरत करावी लागते. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. घंटागाडी येत नाही. धूर फवारणी नाही. साफसफाई होत नाही. परिणामी कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहे. मनपाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळत नाही. अनेक समस्यांचा वडाळा गाव परिसराला विळखा पडला आहे. या भागात घरकूल योजनेतून बांधलेल्या म्हाडा इमारतीची चार, पाच वर्ष होऊनही डागडुजी, रंगकाम आणि देखभाल-दुरुस्ती केली गेली नाही. इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे असून छत गळती होत असून भिंतींची रचनाही चुकली आहे. परिसरातील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात दुर्गंधी असते. गटारी तुंबलेल्या आहेत. मनपा अधिकारी लक्ष देत नाहीत. सफाई कामगारही येत नाहीत. या प्रश्नांची १५ दिवसांत सोडवणूक न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.