जळगाव – मुंबईतील चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने शेती, शेतकरी आणि समाज उपयोगी कार्यासाठी जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडेचे अध्यक्ष अशोक जैन यांना विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात आर्थिक योगदान तसेच मानवतावादी कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ज्यांनी देशाची सीमा ओलांडून जागतिक कल्याण व प्रगती घडवली आहे, अशा उद्योजकांना दरवर्षी विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवॉर्डने गौरविण्यात येते. त्यानुसार, चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने २०२५-२६ या वर्षाकरिता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह अम्रीता विद्यापाठाच्या कुलगुरू अम्रीतानंदमयी, भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी, युपीएल समुहाचे अध्यक्ष विक्रम श्रॉफ, गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नादीर गोदरेज, पीडी लाईट इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मधुकर पारख, व्हॉकार्डचे अध्यक्ष डॉ. हुजेफा खोराखीवाला, क्युके टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष मनीष झवर, सीईजी समुहाचे कार्यकारी संचालक विश्वास जैन, सुहाना मसालाचे संचालक विशाल चोरडीया यांना त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने गेल्या वर्षी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला पद्मविभूषण व पद्मभूषण डॉ. मनमोहन शर्मा प्रमुख अतिथी होते. अशोक जैन यांना भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरूण अनंथानारायणन, अभिनेते जॅकी श्रॉफ, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, रवी अय्यर , वीर अवॉर्डचे संयोजक गगन मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते. कार्यक्रमात दोन विषयांवर परिसंवाद झाले.
जैन इरिगेशनमधील पथदर्शी कार्य कृषी क्षेत्रात क्रांतिकारक ठरले आहे. पाणी व्यवस्थापन, सिंचन आणि अन्न शाश्वतता, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी करत असलेल्या अभिनव उपाययोजनांमुळे जगभरातील शेतकरी आणि समुदाय सक्षम झाले आहेत. आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या समस्यांना उत्तर देण्याचे कार्य जैन इरिगेशन करत आहे. जैन इरिगेशनने आपले नेतृत्व आणि तंत्रज्ञान यामुळे सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून केलेल्या उद्योजकतेचा रूपांतरकारी प्रभाव जगासमोर आणला आहे. वसुधैव कुटुंबकम् या तत्त्वाचा प्रत्यय जैन इरिगेशनच्या कार्यातून येतो. ज्यामुळे जागतिक सौहार्द वृद्धिंगत होत आहे आणि भारताची करुणा व उत्कृष्टतेची परंपरा मुळापासून जगभर पोहोचत आहे. सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे हे जीवनध्येय समोर ठेऊन कार्य करत असल्याचा आनंद आम्हाला आहे, असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.