जळगाव – शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी आता राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीची (नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेस) प्रतिष्ठित सदस्य बनली आहे. या सदस्यत्वाने जैन इरिगेशला कृषी संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात नवीन संधीचे दालन उपलब्ध होणार आहेत. ज्याचा अप्रत्यक्ष लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे.
१९९० मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी भारतातील कृषी संशोधन, शिक्षण आणि धोरणांसाठी काम करणारी एक स्वतंत्र वैज्ञानिक संस्था म्हणून ओळखली जाते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या संकुलात कार्यरत असलेली ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) सोबत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे काम करत आहे. राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे मुख्य उद्दिष्ट शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्टतेची ओळख करणे, सहकार्य वाढविणे आणि ज्ञानाचे प्रकाशन करणे हे आहे. यासाठी संस्था विविध परिषदा, कार्यशाळा, फेलोशिपसारखे पुरस्कार आणि नियमित प्रकाशने यासारखे उपक्रम राबवते. सध्या राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीमध्ये ८२१ सदस्य आहेत. परंतु, कॉर्पोरेट सदस्य म्हणून जळगावमधील जैन इरिगेशन ही एकमेव कंपनी असल्याचे सांगण्यात आले आहे.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे सदस्यत्व मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला. अकादमी सोबतचा हा सहभाग आम्हाला शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास आणि भारतीय शेतीच्या विकासासाठी योगदान देण्यास अधिक सक्षम करेल. ही भागीदारी कृषी संशोधन आणि विकासाला नक्कीच चालना देईल. ज्यामुळे शेतकरी आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणखी सक्षम होण्यास उपयुक्त ठरेल. महाराष्ट्रातील जळगाव येथे मुख्यालय असलेली जैन इरिगेशन ही कंपनी गेल्या सहा दशकांपासून ठिबक सिंचन, सौर ऊर्जा आणि शाश्वत कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनवित आहे. या नव्या सदस्यत्वाने जैन इरिगेशन राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीच्या वैज्ञानिक जालाचा लाभ घेऊ शकेल आणि देशातील कृषी क्रांतीला हातभार लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकेल, अशी प्रतिक्रिया अनिल जैन यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी आणि जैन इरिगेशनच्या संयुक्त भागीदारीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष लाभ होऊ शकेल. जैन इरिगेशनने यापूर्वीही विविध कृषी प्रकल्पांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. हे सदस्यत्व त्या प्रयत्नांना अधिक बळ देईल. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अशा सहकार्याने जलसंधारण आणि जलसुरक्षा याद्वारे शाश्वत शेतीतून उत्पादकता वाढविण्यास मदत होऊ शकणार आहे.