नंदुरबार – आम्ही रामाचे पुजारी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामचे व्यापारी आहेत. राजकारणात धर्माचा वापर करणे हा त्यांचा धंदा असल्याचे टिकास्त्र अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोडले. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबारमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत रमेश यांनी निवडणूक रोख्याबाबत न्यायालयाच्या निर्णयावरून लक्ष हटविण्यासाठी मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याचा विषय पुढे आणल्याचे सांगितले. संसदेने मंजुरी दिल्यावर सीएए लागू करायला चार वर्ष कसे लागले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भारत जोडो न्याय यात्रा पाच तत्वावर सुरू आहे. किसान न्याय शाश्वती, शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी, आरक्षणासाठी संविधान संशोधन हमी आणि बुधवारी धुळ्यातील महिला मेळाव्यात राहुल गांधी हे महिलांच्या कल्याणाविषयक हमी जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी, जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचा दावा केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी मतभेद नाहीत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आंबेडकर यांच्याशी चर्चा करीत असून १७ मार्चनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होतील, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>आधी बैलगाडी उलटली नंतर विळा डोक्यात पडला; जळगाव जिल्ह्यात मुलाचा मृत्यू

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाणार आहेत. राहुल गांधी हे शिवभक्त असून त्यांचे शिवप्रेम दिसू नये म्हणून त्यांना वेगवेगळ्या राज्यातील सरकारांनी रोखल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेसला रामाचे काही वावडे नाही. भारत जोडो यात्रेचा मार्ग वेगळा असल्याने राहुल गांधी हे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या प्रश्नावर रमेश यांनी हरियाणात जय जवान, जय किसान, जय पहिलवान आणि जय युवकचा जो नारा गुंजत आहे, तोच देशभरात गुंजणार असल्याचे नमूद केले. जवान, शेतकरी, पहिलवाल व युवकांमुळे राजीनामा द्यावा लागला. भाजपचे कमळ आणि वॉशिंग मशिन हे दोन चिन्ह आहेत. काँग्रेस सोडणाऱ्यांची कुठलीही विचारधारा नाही, असेही ते म्हणाले.