जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असताना, शासकीय कार्यालयांमधील गैरप्रकार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत जिल्हा परिषदेसह पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी अग्रस्थानी असल्याचे दिसून आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान केलेल्या कारवाई दरम्यान जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात सर्वाधिक १० गुन्हे दाखल दाखल झाले आहेत. त्यानंतर महसूल विभागातील सात, पोलीस आणि महावितरणच्या प्रत्येकी चार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
या व्यतिरिक्त जळगाव महापालिकेसह वन विभागाच्या प्रत्येकी दोन, भूमिअभिलेखसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडाळाच्या प्रत्येकी एक अधिकाऱ्यांविरोधात लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले अधिकारी हे वर्ग-एक, वर्ग-दोन आणि वर्ग-तीन प्रकारातील आहेत. विशेष म्हणजे लाच स्वीकारल्या प्रकरणी दाखल ३५ गुन्ह्यांपैकी केवळ एका खासगी इसमाविरोधात लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी एकूण ३७ कारवाया लाच स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत यंदा ऑक्टोबरअखेर ३५ कारवाया करण्यात आल्या आहेत आणि ५६ संशयित लाच स्वीकारताना जाळ्यात अडकले आहेत. पैकी १३ संशयित हे खासगी इसम असून, उर्वरित सर्व संशयित हे शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचारी असल्याचे दिसून आले आहे. उल्लेखनीय म्हणजे लाचखोरीच्या प्रकरणात तीन महिलांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
लाच घेणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. शासकीय कार्यालयात काम करताना नागरिकांकडून कोणत्याही प्रकारच्या लाचेची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यासंदर्भात सूचना देणारे फलक विविध शासकीय कार्यालयांच्या बाहेर लागलेले दिसून येतात. तरी देखील प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी नियमात असणारी कामे अडवून नागरिकांकडून पैशांची सर्रास मागणी करतात. अशा मागण्या अनेकदा थेट नसल्या तरी फाईल पुढे नेण्यासाठी, तपासणी जलद करण्यासाठी किंवा योग्य अहवाल तयार करण्यासाठी, स्वाक्षरी करून देण्याच्याबहाण्यांनी केल्या जातात. रक्कम एक हजार रुपयांपासून लाखांपर्यंतही असते. भ्रष्टाचाराची पातळी दैनंदिन कामकाजात खोलवर शिरलेली आहे. याबाबत जनजागृती करूनही पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांमध्ये देखील बदल झालेला नाही.
लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी अलीकडे वाढली आहे. गेल्या काही वर्षात लाचेबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी लक्षणीय वाढल्या आहेत. – योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव)
