जळगाव : एका वर्षासाठी संधी मिळाली असताना दोन वर्ष उलटले तरी राजीनामा न देणाऱ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरोधात १४ संचालकांनी सहा तारखेला अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर मंगळवारी निर्णय होण्यापूर्वीच सभापतींनी सोमवारी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पॅनेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तत्कालिन नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या त्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ जागांपैकी ११ जागा जिंकून शिवसेना शिंदे गटाला चांगलीच धुळ चारली होती. शिंदे गटाच्या केवळ सहा जागा निवडून आल्या होत्या. याशिवाय, एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील त्या निकालाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला होता.
विशेष म्हणजे, त्यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी स्वतः पालकमंत्री पाटील यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे बाजार समितीची निवडणुक त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली गेली होती. मात्र, जळगाव ग्रामीणमधील मतदारांनी गुलाबराव पाटील ऐवजी गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. तेव्हापासून जळगाव बाजार समितीवर माजी मंत्री देवकर यांच्या मर्जीतील श्यामकांत सोनवणे हेच सभापती म्हणून कार्यरत होते. अर्थात, सत्ता स्थापनेवेळी सोनवणे यांना फक्त एक वर्षांचा कार्यकाळ देण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात दोन वर्ष उलटल्यानंतरही सोनवणे यांनी सभापती पद सोडले नाही. त्यामुळे सर्व संचालकांमध्ये नाराजीची भावना पसरली असताना अखेर सभापती सोनवणे यांच्या विरोधात १४ संचालकांनी सहा ऑगस्टला अविश्वास प्रस्ताव दाखल केला. तेव्हापासून अविश्वास प्रस्ताव आणणारे सर्व संचालक अज्ञात स्थळी सहलीला रवाना झाले होते. विशेष म्हणजे सभापतींना पायउतार करण्याची खेळी माजी मंत्री देवकर यांचीच असल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, सभापती श्यामकांत सोनवणे यांनी अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या संचालकांशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. परंतु, त्यात त यश न आल्याने शेवटी त्यांनी १२ दिवसांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची थेटघेतली. आणि आपण स्वतःहून राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार, सोनवणे यांनी सोमवारी सभापती पदाचा तातडीने राजीनामा सुद्धा दिला. स्वतः माजी मंत्री देवकर यांनी त्या संदर्भात माहिती स्वतः पत्रकारांना दिली. यावेळी सभापती सोनवणे सुद्धा उपस्थित होते. ज्या कारणासाठी संचालकांनी सभापतींवर अविश्वास ठराव आणला होता, तेच कारण आता शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे संचालकांच्या नाराजीमुळे ओढवलेल्या अविश्वास ठरावाच्या नाट्यावर आता पडदा पडला आहे, असे देवकर यांनी स्पष्ट केले.