जळगाव – नैसर्गिक आपत्तीसोबतच काही घातक रोगांमुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने संबंधित शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर, जळगावमधील जैन इरिगेशन आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. ज्या माध्यमातून फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही, या प्रमुख रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी संशोधन केले जाणार आहे.

केळी पिकातील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (कुकुम्बर मोजेक व्हायरस) या प्रमुख रोगांमुळे गेल्या काही वर्षात केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. या दोन्ही रोगांचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी जैन इरिगशनने पुढाकार घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे केळी बागेतील विविध रोगांसह आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन कार्य आगामी काळात वाढीस लागणार आहे.

या करारावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन आणि जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी नुकत्याच स्वाक्षरी केल्या. या प्रसंगी ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पी. गोविंदराज तसेच जैन इरिगेशनचे डॉ. अनिल पाटील, डॉ. एस. नारायणन उपस्थित होते.

जळगावमधील जैन इरिगेशन गेल्या ३५ वर्षांपासून केळी पिकावर सातत्याने काम करत आहे. कंपनीने टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाद्वारे विषाणूमुक्त (व्हायरस फ्री) रोपे विकसित केली आहेत, ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, जळगावसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही रोगांचे संकट गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहे.

केळीवरील हे रोग भारतासह जगभरातील केळी व्यवसाय आणि शेतीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करताना दिसत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील (पीपीपी) प्रकल्पाअंतर्गत करार करून त्यावरील संशोधनास चालना देण्यात येणार आहे. या करारामुळे शास्ज्ञांना एकत्रितपणे रोग नियंत्रणाच्या नवीन पद्धती विकसित करण्यास चालना देणे शक्य होईल, असे डॉ. सेल्वराजन म्हणाले.

जैन इरिगेशनने कृषी क्षेत्रात शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या जागतिक पातळीवर बरेच कार्य केले आहे. त्याचप्रमाणे शेती, पाणी आणि पर्यावरणासंदर्भात जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांचे कार्य सर्वश्रृत आहे. त्यांच्या दूरदृष्टीने साकारलेले टिश्युकल्चर तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरले असून, त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तावाढी बरोबरच केळी निर्यातीला चांगली चालना मिळाली आहे.

नवीन कराराअंतर्गत होणाऱ्या संशोधनातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना फ्यूजारियम विल्ट आणि सीएमव्ही सारख्या घातक रोगांचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. यामुळे जळगावसह महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीवरील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येईल. या संशोधन कार्यात केळी उत्पादकांच्या शेतावर सुद्धा संशोधन करण्यात येईल. परिणामी, शेतकऱ्यांचा रोग नियंत्रणावरील खर्च कमी होऊ शकेल. त्यांना केळी उत्पादन वाढीबरोबरच आर्थिक स्थैर्य लाभेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.