जळगाव : देशांतर्गत मागणी, निर्यातीला चालना आणि नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीमुळे सध्या सगळीकडे केळीचा तुटवडा असून, भावातही तेजी आहे. असे असताना मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीचे भाव मुद्दाम कमी करण्याचे षडयंत्र संबंधित यंत्रणेकडून रचण्यात आल्याची शंका शेतकऱ्यांना आहे. दोनच दिवसात क्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

खान्देशातील जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या केळीचे भाव ठिठठिकाणच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून दररोज जाहीर केले जात असले, तरी व्यापारी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीकडून काढले जाणारे भाव प्रमाण मानतात. याव्यतिरिक्त संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांचेही बऱ्हाणपूरच्या केळी भावाकडे लक्ष असते. त्यामुळे बऱ्हाणपूरमध्ये केळीच्या भावात थोडाजरी चढ-उतार झाला तरी संपूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटतात.

याच गोष्टीचा फायदा उचलून बऱ्हाणपूर बाजार समितीत सध्या मनमानी पद्धतीने केव्हाही आणि कितीही केळीचे भाव वाढविण्याचे आणि कमी करण्याचे उद्योग तिथे बसलेली यंत्रणा करत असल्याने केळी उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दोन दिवसातील केळी भावाची आकडेवारी लक्षात घेता, शुक्रवारी बऱ्हाणपूरमध्ये केळीचे भाव ३०३५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी शनिवारी केळीचे भाव २५०० रुपयांपर्यंत खाली आले. रविवारी पुन्हा त्यात ५० रुपयांची घट झाली.

एका गाडीमागे ७५ हजार रुपयांची झळ

सध्याची स्थिती लक्षात घेता केळीचे भाव क्विंटलमागे एकदम ५०० रुपयांनी घसरल्यानंतर शेतकऱ्यांना एका गाडीमागे (१५० क्विंटल) सुमारे ७५ हजार रुपयांची आर्थिक झळ बसली आहे. भाव वाढत असताना शेतकरी आणखी चांगल्या भावाच्या आशेने इतके दिवस केळीची कापणी करत नव्हते. मात्र, दोनच दिवसात ५०० रुपयांनी भाव कमी झाल्यानंतर शेतकरी आता आणखी भाव कमी होण्याच्या भीतीने केळी कापणीसाठी घाई करू लागले आहेत. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच जास्त करून होत आहे.

बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जर कोणी जाणुनबुजून केळीचे भाव कमी-जास्त करत असेल तर ते चुकीचे आहे. संबंधित यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी एक जबाबदार अधिकारी तिथे तातडीने नियुक्त केला जाईल.- हर्ष सिंह (जिल्हाधिकारी, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बऱ्हाणपूर बाजार समितीत सध्या केळीचे दररोज भाव काढले जातात. त्याऐवजी १० दिवसातून एकदाच भाव काढण्यात यावे. जेणेकरून केळीचे भाव काही दिवस स्थिर राहतील. शेतकऱ्यांनाही चढ-उतारामुळे होणाऱ्या नुकसानीचा फटका बसणार नाही.- अतूल पाटील (केळी उत्पादक, केऱ्हाळे, ता.रावेर, जि.जळगाव)