जळगाव : अमळनेर पोलिसांनी विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक किमतीच्या २४ दुचाकींसह दोन संशयितांना तीन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. जळगाव कारागृहात जागा नसल्याने संबंधितांना नंदुरबार जिल्हा कारागृहात हलविताना दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी पलायन केल्याचे उघडकीस आले आहे.
हिमंत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोन्ही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी पोलिसांच्या हातावरी तुरी देऊन पसार झालेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.
अमळनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या गुन्हे क्रमांक ३०८/२०२५, २९९/२०२५ आणि २३३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(दोन) नुसार चोरीच्या दुचाकींचा शोध सुरु होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. या तपासातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात हिंमत पावरा आणि अंबालाल खरर्डे हे चोरटे असल्याचे निष्पन्न झाले.
अमळनेर पोलिसांनी दोघांना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव भागात सापळा रचत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर दोघांनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून असंख्य दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून सातपिंप्री येथील जंगल परिसर पिंजून काढत चोरीच्या एकूण २४ दुचाकी हस्तगत केल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी प्रामुख्याने होंडा यूनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर, हीरो स्प्लेंडर, अशा विविध कंपनींच्या आहेत. ज्यांची एकत्रित किंमत १५ लाख ६३ हजार रूपये इतकी आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांची न्यायालयीने कोठडीत रवानगी झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून दोन्ही संशयितांना नंदुरबार कारागृहात हलविण्याचा निर्णय झाला होता.
दोघांची शनिवारी दुपारी शासकीय वाहनातून नंदुरबारला नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नंदुरबारकडे जाताना दोंडाईचा परिसरातील धावडे गावाजवळ पोलिसांचे पथक काही वेळ चहा पिण्यासाठी थांबले. त्याच वेळी दोघा संशयितांनी लघुशंकेचा बहाणा केला. पोलिसांनी त्यांना परवानगी दिल्यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत दोघेही चकवा देत पळून गेले.
घटनेनंतर स्थानिक पोलिसांना तातडीने सतर्क करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा, अमळनेर, धुळे आणि नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नाकाबंदी करून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत दोन्ही संशयितांचा कुठेच तपास लागला नाही. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा दोघांचा शोध सुरू करण्यात आला.
