जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शुक्रवारी केला. त्यानंतर पीडित महिला तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यातही पोहोचली; मात्र, गुन्हा दाखल होण्याआधीच माघारी फिरली. यामुळे संबंधित निरीक्षकावरचे संकट तूर्त टळल्याचे दिसत असले, तरी जळगाव पोलिसांची अब्रू मात्र धुळीस मिळाली आहे.

जळगावात जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान चाळीसगावमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एक गंभीर मुद्दा मांडला. एका महिलेच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा प्रकार घडला असून, पोलिसांत तक्रार केल्यास तिला जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे या धमक्या स्थानिक गुन्हे शाखेतील निरीक्षक तसेच त्याच्या कुटुंबीयांकडून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आमदारांकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांनाही गोळी झाडण्याची धमकी संबंधित निरीक्षकाकडून देत असल्याचे चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यासंदर्भात आपल्याकडे ध्वनीमुद्रीत पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाकडून अशा पध्दतीने महिलांचे शोषण होत असेल. तसेच आमदारांसारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीला बंदुकीची गोळी घालण्याची धमकी देण्यात येत असेल, तर ही बाब अतिशय गंभीर असल्याची खंत देखील त्यांनी सभागृहात व्यक्त केली.

त्याच दिवशी पीडित महिला जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधित निरीक्षकाच्या विरोधाच तक्रार देण्यासाठी पोहोचली. प्रत्यक्षात, दिवसभर बसून राहिल्यानंतरही तिने संबंधित निरीक्षकाच्या विरोधात कोणतीच तक्रार केली नाही. मात्र, पोलीस प्रशासनाची अब्रू धुळीस मिळविण्यास कारणीभूत ठरलेल्या संबंधित निरीक्षकाची तडकाफडकी उचलबांगडी करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षकांनी केली.

आमदार चव्हाण यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर संबंधित पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल होण्याची वेळ आली होती. परंतु, पीडित महिलेने ऐनवेळी विचार बदलल्याने ती वेळ आली नाही. या दरम्यान ते दोन दिवस संपूर्ण पोलीस प्रशासन पार हादरून गेले होते. खुद्द पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच इतर काही जबाबदार पोलीस अधिकारी पत्रकारांना टाळताना दिसून आले.

तीन महिन्यात निरीक्षक बदलण्याची नामुष्की

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील स्थानिक गुन्हे शाखा एरवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असते. तत्कालिन उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. त्यासोबतच अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून हप्ता वसुली केल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली.

त्यानंतर पोलीस प्रशासनाने स्थानिक गुन्हे शाखेची धुरा चांगल्या सक्षम अधिकाऱ्याकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, निरीक्षक बबन आव्हाड यांची बदली करून त्यांच्या जागी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्यक्षात, तीनच महिन्यात पुन्हा निरीक्षक बदलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली.