जळगाव – पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यापासून शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, महामार्गालगतच्या गावांकडे जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या सेवा रस्त्यांच्या कामांना आता चालना देण्यात आली आहे. त्या पैकी काही सेवा रस्ते वाहतुकीस खुले देखील झाले आहेत.
शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाळधी ते तरसोद या बाह्यवळण मार्गाचे काम काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी एकदाचा खुला झाल्याने जळगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. विशेषतः शहराचा विस्तार आता उत्तरेकडे होण्याचा मार्ग खुला झाला आहे. बाह्यवळण महामार्गालगतच्या काही गावांमधील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरूण आणि शेतकऱ्यांचा कृषी आधारीत प्रक्रिया तसेच इतर काही उद्योग सुरू करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बाह्यवळण महामार्गालगतच्या शेती शिवाराला बिनशेतीकरणासह शासनाच्या २०२३ च्या औद्योगिक धोरणानुसार डी प्लस दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रातील काही विकसकांनी शहरालगतच्या गावांमध्ये मोक्याच्या जमिनींची पाहणी करण्यास सुरूवात केली आहे. जळगाव शहराच्या आणि दक्षिण भागाच्या तुलनेत काही प्रमाणात स्वस्त असलेल्या या भागातील जमिनी गुंतवणुकदारांना आकर्षित करत आहेत. पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर आव्हाणे, ममुराबाद, आसोदा आणि तरसोद येथे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या उड्डाणपुलांच्या लगत असलेल्या सेवा रस्त्यांच्या कामांना आता कंत्राटदार कंपनीकडून चालना देण्यात आली आहे.
सेवा रस्ते कार्यान्वित झाल्यानंतर नव्याने विकसित होणाऱ्या जळगाव शहराची तसेच परिसरातील गावांची मोठी सोय होणार आहे. यामुळे उड्डाणपुलांच्या खालून जाणारे ग्रामीण भागातील रस्ते बाह्यवळण महामार्गाशी जोडले जात आहेत. भुसावळ किंवा एरंडोल-धरणगावकडे जाण्यासाठी कमी अंतराची सोय त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांची झाली आहे.
पाळधी ते तरसोद २० मिनिटात
बाह्यवळण महामार्ग अस्तित्वात येण्यापूर्वी वाहनधारकांना पाळधीहून तरसोद जाण्यासाठी जळगाव शहरातील जुन्या महामार्गावरून किमान पाऊण तासाचा वेळ लागत असे. मात्र, बाह्यवळण महामार्गामुळे पाळधी ते तरसोद प्रवासाची वेळ आता २० मिनिटांवर आली आहे. वाहनांच्या इंधन खर्चाची मोठी बचत त्यामुळे होत आहे. विशेष म्हणजे जळगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघाताचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे. नागरिकांनी त्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.