जळगाव – चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे विना परवाना चालविल्या जात असलेल्या कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत सुमारे सात लाख ३५ हजार रुपये किमतीचे रासायनिक खत तसेच कपाशी, मका बियाण्याचा साठा जप्त करून संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर येथे न्यू लक्ष्मी कृषी केंद्र नावाने योगीराज पाटील (३०, रा. नागलवाडी) हा तरूण २५ मेपासून विना परवाना बियाणे आणि रासायनिक खते विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याबाबतची खात्री करण्यासाठी जळगाव जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकला असता योगीराज पाटील हा शासनाची दिशाभूल करून बियाणे आणि खते परवाना न घेता अनधिकृतपणे सर्रास विक्री करत असल्याचे आढळून आले.
पथकाने कृषी केंद्रात विना परवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेले सुमारे चार लाख ५२ हजार ४४६ रुपये किमतीचे २० टन (४०५ गोण्या) रासायनिक खत आणि दोन लाख ८३ हजार ४१८ रुपये किमतीच्या मका आणि कपाशी बियाण्याची १८८ पाकीटे जप्त केली. जप्त केलेल्या साठ्यास विक्री बंदचा आदेशही देण्यात आला.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून योगीराज पाटील याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल. भरारी पथकात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अविनाश खैरनार, चोपडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण पाटील, मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांचा समावेश होता. सदरची कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.