जळगाव – शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाळधी ते पाळधी सुमारे ४० किलोमीटर अंतराच्या रिंग रोडचा प्रस्ताव शासनाकडे काही वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. त्यास इतक्या वर्षात चालना मिळाली नसताना, बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यानंतर रिंग रोडचा विषय आता बाजुला पडल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रिंग रोडसाठी शासनाकडे बराच पाठपुरावा केला होता.

पाळधीहून नशिराबादकडे जाण्यासाठी नागरिकांना आतापर्यंत शहरातील राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागत होता. त्याचप्रमाणे शिरसोलीहून ममुराबादकडे जाणाऱ्यांनाही शहरातूनच मार्गक्रमण करावे लागत असे. विमानतळाकडून पाळधीकडे जाण्यासाठी देखील शहरातील महामार्गाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या परिस्थितीमुळे शहरातील वाहतुकीचा ताण तसेच नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अनावश्यक खर्च वाढत होता. ही समस्या ओळखून नागरिकांना दिलासा मिळावा तसेच ग्रामीण भागाला थेट जोडणारा पर्याय उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून जळगाव शहराला वळसा घालणाऱ्या रिंगरोडच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.

राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावापासून सुरू होणारा रिंगरोड फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, कुसुंबा, मोहाडी, सावखेडा मार्गे पुन्हा पाळधीशी जोडण्यात येणार होता. पाळधीपासून सावखेडापर्यंत एकूण नऊ गावांना जोडणारा सुमारे ४० किलोमीटर लांबीचा हा रस्ता तयार करण्याची योजना होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षणही केले होते. त्याच प्रमाणे प्रस्तावित रिंग रोडवरील गावांच्या जुन्या रस्त्यांना जोडणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक ३८ ची निर्मिती देखील करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात रिंग रोड साकारताना आलेल्या विविध अडथळ्यांमुळे त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली गेली. तो इतक्या वर्षात कागदावरच राहिला. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव दौऱ्यावर आले असता, पालकमंत्री पाटील यांनी रिंग रोडसाठी त्यांच्याकडे आवश्यक निधीची मागणीही केली होती.

दरम्यान, पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहरातून जाणाऱ्या अवजड वाहतुकीचा मोठा प्रश्न आता बऱ्यापैकी सुटला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर शहरातील जुन्या रिंग रोडवरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना जोडणारा महत्त्वाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. या दोन्ही कामांमुळे वाहतुकीची सुलभता वाढल्याने कोंडीची समस्या कमी होत आहे. वाहतुकीचा वेग वाढून नागरिकांना सहज आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे जळगाव शहराभोवती प्रस्तावित असलेल्या पाळधी ते पाळधी रिंग रोडच्या प्रस्तावाची शासनाकडून सध्या तरी दखल घेतली जाण्याची शक्यता मावळली आहे.

जळगाव शहराभोवती प्रस्तावित रिंग रोडची गरज पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गामुळे सध्या तरी कमी झाली आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास रिंग रोडची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल. या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटींचा निधी लागणार आहे. -प्रशांत सोनवणे (अधीक्षक अभियंता- सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव)