जळगाव – सातपुडा पर्वतरांगात वसलेले यावल तालुक्यातील अतिदुर्गम असे आंबापाणी गाव. या गावातील आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधा जाणून घेण्यासाठी तब्बल २० किलोमीटरची पायपीट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. त्यांच्यासमवेत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनाही पायपीट करावी लागली. त्यांनी मतदान केंद्रासह आदिवासी बांधवांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

तत्कालीन जिल्हाधिकारी सुजाता सौनिक यांनी १० वर्षांपूर्वी अशाच प्रकारे आदिवासी भागातील बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आंबापाणीला जाण्यासाठी हरिपुरा गावापासून पायी प्रवास करावा लागतो. परतीचा प्रवास करून हे अंतर सुमारे २० किलोमीटर होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी हरिपुरापासून पायपीट करुन आंबापाणी गाठले. तेथे त्यांनी मतदारयादीतील नोंदणीविषयी माहिती घेतली. मतदान केंद्राला भेट देऊन सोयी-सुविधांची पाहणी केली. चोपडा मतदारसंघातील हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकमेव कच्चे मतदान केंद्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचे आणि अंगणवाडीचे पक्के बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. महिला मतदारांची संख्या कमी असल्यामुळे कारणांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी वाढवावी. मृत मतदारांची नावेदेखील तत्काळ कमी करावीत. मतदान केंद्रात पथकातील कर्मचारी आणि मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करून योग्य पद्धतीने नियोजन करावे. मतदार केंद्रावर ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा – नाशिक : भेसळयुक्त पनीर, मिक्स मिल्क साठा जप्त

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याची सादही जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना घातली. जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक स्थितीबद्दल माहिती जाणून घेत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिल्या. ग्रामस्थांनी त्यांची कला, संस्कृती, परंपरा, शिक्षण, उपजीविका, दैनंदिनी अडचणींबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी यावल येथील निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक तहसीलदार रशीद तडवी, मंडळ अधिकारी अतुल बडगुजर, तलाठी टेमरसिंग बारेला यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

हेही वाचा – बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वनमंत्र्यांना साकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावविकासासाठी त्रिसूत्री आंबापाणी गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रम करण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यात गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्यानंतर या गावाला एलजीडी कोड देण्यात येईल. यामुळे गाव शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र होईल. गावाचा गावठाणाबाबतचा प्रस्ताव मार्गी लावण्यात येईल. तसेच गावातील व्यक्तींना १०० टक्के जातीचे दाखले आणि जन्मप्रमाणपत्र तसेच आधार कार्ड याबाबत शिबीर घेऊन काम करण्यात येईल. गावात गर्भवती महिला व नवजात बालकांचे लसीकरण व आरोग्यविषयक सुविधांसाठी लसीकरण व आरोग्य शिबीर घेण्यात येईल. याशिवाय, गावात रोजगार हमी योजनेतून रस्त्यांचे काम करण्यात येईल. शेतजमीन सपाटीकरण व फळपीक लागवड या विषयांवर काम करण्यात येईल. आदिवासी विकास विभागामार्फत शबरी घरकुल योजना प्रस्तावित करण्यात येईल.