जळगाव – बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे सध्या नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या ठिकाणी इतर बंद्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाऐवजी घरगुती जेवण मिळावे म्हणून त्यांनी आपल्या वकिलांमार्फत अर्ज केला आहे.

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना माजी महापौर कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे नखाते यांनी २८ सप्टेंबरला एल. के. फार्म हाऊसवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी माजी महापौर कोल्हे आणि इतर १० संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर कोल्हे यांची जळगाव कारागृहात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, जळगावात पुरेशी जागा नसल्याने कोल्हे यांची नाशिकच्या कारागृहात रवानगी झाली. तेव्हापासून कोल्हे हे नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीतच आहेत.

पोलिसांनी बोगस कॉल सेंटर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी कोल्हे यांच्यासह इतर संशयितांना न्यायालयीन कोठडी मागताना तपास करून नागरिकांना फसविण्यासाठी वापरलेल्या स्क्रिप्ट्स कोणी तयार केल्या, संशयितांनी फसवणूक करून मिळविलेली मोठी रक्कम त्यांनी कशी प्राप्त केली, ती रक्कम त्यांनी कुठे ठेवली, तसेच बनावट बँक खात्यांचा वापर केला गेला आहे का, कॉल सेंटर चालविण्यासाठी संशयितांचे विदेशात कोणी साथीदार आहेत का, यादृष्टीने आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा आणि गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह अन्य तीन जणांचा शोध घेणे बाकी असल्याची कारणे न्यायालयाला दिली होती. त्यानुसार, सुनावणीअंती कोल्हे व इतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

तरच ललित कोल्हेला घरगुती जेवण…

माजी महापौर कोल्हे यांनी इतर बंद्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाऐवजी बाहेरून घरगुती जेवण मागविण्याची परवानगी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयाकडे केली आहे. प्रत्यक्षात, न्यायालयाने कोल्हे यांच्या अर्जानंतर तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांचे म्हणणे मागवले आहे. त्यानंतरच कोल्हे यांना घरगुती जेवण देण्यासंदर्भात सुनावणीअंती निर्णय होऊ शकणार आहे. तूर्त कोल्हे यांना इतर बंद्यांना मिळणाऱ्या कारागृहातील जेवणावरच आपली भूक भागवावी लागेल, असे दिसते.