जळगाव : जिल्ह्यात खरीप पिकांना रासायनिक खते देण्याची लगबग सुरू असताना, काही कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता बऱ्याच ठिकाणी अनियमितता आढळून आली. जिल्हा कृषी अधीक्षकांच्या आदेशावरून त्यापैकी तीन कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने रद्द करून १२ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते विशेषतः युरीया मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना मागणीनुसार आणि योग्य दरात देत नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने जिल्हा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी तपासणी केली. तेव्हा शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची खात्री करण्यासाठी जिल्हा भरारी पथकाने बनावट ग्राहक पाठवून युरियाची मागणी केली. बऱ्याच कृषी केंद्रांच्या गोदामात युरीया मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही ग्राहकाला उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. जळगावसह जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, भडगाव या पाच तालुक्यातील काही खत विक्रेत्यांकडील खतांचा साठा आणि विक्रीत तफावत आढळून आली.
भरारी पथकाने त्यानंतर संबंधित कृषी केंद्रांची कसून तपासणी केली. अनियमितता, दप्तर नोंदणी आणि खतांचा साठा असतानाही मनमानी पद्धतीने विक्री केल्याच्या कारणावरून त्यांना नोटीसही बजावण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्याकडे सुनावणी झाली असता संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार जळगाव तालुक्यातील तीन, अमळनेर तालुक्यातील सहा, चाळीसगाव तालुक्यातील एक आणि भडगाव तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील तीन खत परवाने थेट रद्द केले गेले. याशिवाय, जळगावसह जामनेर आणि चाळीसगावमधील सात खत विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली.
रासायनिक खते उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना त्यांची विक्री न करता कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवर यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कुर्बान तडवी यांनी दिला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातही शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या १८ कृषी केंद्र चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही नफेखोरीला चटावलेले कृषी केंद्र चालक जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. कोणाचाही धाक न बाळगता शेतकऱ्यांची सर्रास लूट करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर यापुढेही कारवाई केली जाईल, असे जिल्हा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे यांनी म्हटले आहे.