जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरवाढीला अचानक ब्रेक लागला असून, महागाईने त्रस्त ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दोन्ही धातुंच्या दरवाढीला दिवाळीनंतर लागलेला लगाम तात्पुरता असेल की दीर्घकालीन, याकडे आता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष वेधले गेले आहे.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीच्या आधी २४ कॅरेट सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३५ हजार रूपयांवर पोहोचले होते. तर चांदी जीएसटीसह एक लाख ९० हजारांवर पोहोचली होती. अर्थात, दिवाळीपर्यंत दरात मोठे चढ-उतार होऊनही दोन्ही धातुंचा दबदबा कायम राहिला. त्यामुळे मुहुर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांना थोडा हात आखडताच घ्यावा लागला. सुवर्ण व्यवसायाच्या एकूण आर्थिक उलाढालीवर देखील १० ते २० टक्क्यांनी परिणाम झाला. दिवाळीनंतर मात्र दोन्ही धातुंच्या दरात घसरण सुरू झाली, जी आजतागायत कमी-अधिक फरकाने कायम आहे.
लक्ष्मीपूजनाला जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३२ हजार ८७० रूपयांपर्यंत होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरू राहिल्याने सोन्याचे दर ३० ऑक्टोबरअखेर एक लाख २४ हजार ४२४ रूपयांपर्यंत खाली आले आहेत. १० दिवसांच्या कालखंडात सोन्यात तब्बल ८४४६ रूपयांची घट नोंदवली गेली असून, लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर आर्थिक कुवतीनुसार सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तेवढा फटका बसला आहे. सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर मागणीच्या तुलनेत आता सोन्याचा पुरवठा अधिक आहे. ज्यांनी कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक केली होती, ते आता विक्रीवर भर देत आहेत. दुसरीकडे नोव्हेंबरपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत असला, तरी ज्यांना दागिने खरेदी करायचे आहेत त्यांनी ते संभाव्य दरवाढीच्या भीतीने आधीच खरेदी करून ठेवले आहेत. त्यामुळे पुढील काळात सोने खरेदी वाढण्याची चिन्हे नाहीत.
अशाच प्रकारे, लक्ष्मीपूजनाला जळगावात चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरू राहिल्याने चांदीचे दर ३० ऑक्टोबरअखेर एक लाख ५४ हजार ५०० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. १० दिवसांच्या कालखंडात चांदीत तब्बल १५ हजार ४५० रूपयांची घट नोंदवली गेली असून, लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर आर्थिक कुवतीनुसार चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तेवढा फटका बसला आहे. वायदा बाजारातही आता चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. दिवाळीच्या काळात चांदीसाठी प्रिमियम दराने पैसे मोजण्यासाठी वेळ आली होती. परंतु, आता चांदीचा तोरा उतरला आहे.
