जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी आणखी वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर एक लाख तीन हजार ८२४ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दुसरीकडे, चांदीच्या दरात सोमवारच्या तुलनेत कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही.
जळगावमध्ये सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख तीन हजार हजार रूपयांपर्यंत होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच ८२४ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख तीन हजार ८२४ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. चांदीचे दर मंगळवारी सकाळी स्थिरच होते. सोन्याच्या दरात सुरू असलेली घोडदौड लक्षात घेता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिक चांगलेच धास्तावले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री व्यवहारांना गती येण्याची आशा विशेषतः व्यावसायिक बाळगून होते. तत्पूर्वीच सोन्याचे दर पुन्हा उच्चांकाकडे वाटचाल करतात की काय, अशी परिस्थिती गेल्या काही दिवसात निर्माण झाली आहे.
दरम्यान, सोन्याच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ ग्राहकांसाठीही चिंतेचा विषय बनली आहे. ही वाढ केवळ गुंतवणूकदारांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही आर्थिक ताण निर्माण करत आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर सोने सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम मानले जाते, त्यामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली की गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. सध्या अमेरिकन अर्थव्यवस्थेतून आलेल्या कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे.
परिणामी, गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत. आणि सोने त्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानले जात आहे. दुसरीकडे, भारतीय रुपया कमकुवत झाल्याने आयात केलेल्या सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. कारण भारतात सोने बहुतांश प्रमाणात आयात केले जाते. याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या दरावर झाल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे.
अशा परिस्थितीत सामान्य जनतेला दागिन्यांची खरेदी करताना किंवा लग्नसराईच्या काळात खर्च करताना अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे अनेकांच्या घरगुती अर्थसंकल्पावरही ताण येणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, दीर्घकालीन लाभाच्या आशेने काही लोक अजूनही सोन्यात गुंतवणूक करत आहेत. परंतु वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांसाठी ही गुंतवणूक दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे.
सध्या भारतात सोन्याच्या आयातीवर लागू असलेल्या शुल्क आणि विविध करांमुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे शुल्क वाढल्याने देशात सोने आणखी महाग झाले असून, या धोरणाचा थेट परिणाम देशांतर्गत ग्राहकांवर आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांवर होत आहे. अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सरकारकडून लावण्यात आलेल्या या अतिरिक्त शुल्कांमुळे आगामी काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.