जळगाव : शहरातील बोगस कॉल सेंटर प्रकरणी शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याही अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. कोल्हे यांच्यामुळे यापूर्वीही एकदा मंत्री पाटील अडचणीत सापडल्याचे आणि त्यामुळे त्यांचे राजकारण काही काळासाठी धोक्यात आल्याचे सांगितले जाते.
मनसेच्या माध्यमातून वयाच्या २१ व्या वर्षी नगरसेवकपदाची पहिली पायरी गाठणारे ललित कोल्हे यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. २००९ मध्ये जळगाव ग्रामीण आणि २०१४ मध्ये जळगाव शहरातून त्यांनी आमदारकीसाठी मनसेच्या तिकीटावर प्रयत्न केला; मात्र, दोन्ही वेळा त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यानंतर त्यांनी जळगाव महापालिकेवर लक्ष केंद्रित केले.
माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीचा पाठिंबा मिळवून महापौरपदी निवडून येत आपल्या राजकीय प्रवासात महत्त्वाची मजल मारली. या प्रवासात त्यांना मनसेप्रमुख राज ठाकरे, माजी मंत्री सुरेश जैन आणि मंत्री गिरीश महाजन यांचा वेळोवेळी आधार मिळाला. मात्र, पुढे जाताना कोल्हे यांनी तिन्ही नेत्यांपासून दूर जात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आताही ते शिवसेनेत (एकनाथ शिंदे) सक्रीय असताना, त्यांच्यामुळे पक्षाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे टेंशन वाढल्याचे बोलले जात आहे.
मनसे, भाजप, खान्देश विकास आघाडी फिरून आल्यानंतर ललित कोल्हे आता कुठे शिवसेनेत (एकनाथ शिंदे) स्थिरावले होते. त्यांनी शिंदे गटातर्फे जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुद्धा केली होती. तत्पूर्वीच, आपल्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालवून विदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. राजकीय वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपची जिरवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शिंदे गटाला पर्यायाने पालकमंत्री पाटील यांनाही मोठा हादरा बसल्याची चर्चा आहे. पक्षाचा मोठा पदाधिकारी पोलीस कारवाईच्या कचाट्यात सापडल्यानंतर त्याबद्दल काही एक बोलण्याची सोय मंत्री पाटील यांना राहिलेली नाही.
२००९ मध्ये विधानसभेचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत गुलाबराव पाटील यांचा पराभव राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार गुलाबराव देवकर यांनी केला होता. देवकर यांना त्यावेळी ७१ हजार ५५६ मते, तर पाटील यांना ६६ हजार ९९४ मते मिळाली होती. देवकर यांच्याकडून फक्त ४५६२ मतांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर गुलाबराव पाटील यांना पाच वर्षे घरी बसावे लागले होते. त्यावेळी देवकर आणि पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली असली, तरी मनसेकडून निवडणूक लढणारे ललित कोल्हे यांचीही उमेदवारी लक्षवेधी ठरली होती. कारण, कोल्हे यांना तेव्हा १३ हजार ५७० तेवढी मते मिळाली होती. अर्थात, गुलाबराव पाटील यांच्या त्या वेळच्या निसटत्या पराभवाला कोल्हे यांची ती मते मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली होती. कोल्हे मैदानात नसते तर कदाचित गुलाबराव पाटील विजयी झाले असते. अर्थात, नंतरच्या पंचवार्षिकमध्ये कोल्हे जळगाव ग्रामीणमध्ये कधीच उभे राहिले नाहीत.