जळगाव : पाण्याची आवक घटल्याने जिल्ह्यातील हतनूर धरणाचे फक्त चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. मात्र, बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे आणखी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. एकूण सहा दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाला तरी पावसाला पाहिजे तसा जोर नाही. मात्र, विदर्भात तसेच पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाला तापी नदीवरील हतनूरचा विसर्ग वाढवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीही यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूरचे ४६ पैकी १६ दरवाजे एक मीटरने उघडावे लागले होते. मध्यंतरी आवक कमी झाल्याने उघडलेले बहुतांश दरवाजे पुन्हा बंद करून नंतर फक्त चार दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले. ज्या माध्यमातून ४२३८ क्सूसेकने विसर्ग सुरू होता.

दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवरील नोंदीनुसार बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात बऱ्हाणपुरात ३.४, देढतलाईत ५.४, टेक्सामध्ये ३१.८, एरडीत ३.०, गोपालखेड्यात ४.२, चिखलदऱ्यात १३.८, लखपुरीत १२.८, लोहाऱ्यात २१.२, अकोल्यात १५.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. एकूण १११ मिलिमीटर (सरासरी १२.३) पावसामुळे हतनूरच्या पाण्याची आवक बऱ्यापैकी वाढल्याने आणखी दोन दरवाजे बुधवारी सकाळी उघडावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीत आता ६३५७८ क्सूसेकने विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाची एकूण पाणी पातळी २१०.४५ मीटर आणि पाणीसाठ्याची टक्केवारी ५४.६४ इतकी आहे, अशी माहिती हतनूर धरणाचे शाखाधिकारी भावेश चौधरी यांनी दिली. दरम्यान, हतनूरचे सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्यानंतर तापीवर खालच्या बाजुला असलेल्या शेळगाव बॅरजचेही तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ज्यामाध्यमातून बुधवारी सकाळी ४५८१ क्सूसेकने नदीत विसर्ग सुरू होता. पाण्याची आवक वाढल्यानंतर हतनूर पाठोपाठ शेळगाव बॅरेजचे दरवाजे आणखी उघडले जाऊ शकतात, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.