जळगाव – गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात कुठेच पावसाला जोर नसल्याने जिल्ह्यातील हतनूर धरणाची आवक घटली होती. पाटबंधारे विभागाकडून धरणाचे दोन दरवाजे फक्त अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पुनरागमनानंतर पुन्हा आवक वाढल्याने हतनूरचे सहा दरवाजे आता एक मीटरने उघडण्यात आले आहेत. विसर्ग वाढल्यामुळे तापी नदी पुन्हा खळाळताना दिसू लागली आहे.
जिल्ह्यात जुलै संपण्यावर आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने काहीशी निराशा झाली असली, तरी पाणलोट क्षेत्रात अधूनमधून जोरदार पाऊस होत असल्याने हतनूरच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाला वेळोवेळी धरणाचे काही दरवाजे उघडून विसर्ग नियंत्रित करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीही यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूरचे १६ दरवाजे एक मीटरने उघडावे लागले होते. त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने बहुतांश दरवाजे बंद करून केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले. मात्र, आता पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने धरणातील उपयुक्त पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाला सहा दरवाजे एक मीटरने उघडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवरील नोंदीनुसार, देढतलाई येथे १३.० तसेच टेक्सा येथे ६०.४, चिखलदऱ्यात ९.६, लखपुरीत १८.०, लोहाऱ्यात ३१.४ आणि अकोल्यात १.२ मिलीमीटर पाऊस पडला. एकूण १३३.८ मिलीमीटर (सरासरी १४.९) पावसामुळे हतनूरचे सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी सांडव्यातून ११ हजार ४४२ क्यूसेक आणि कालव्यातून ५० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.
दरम्यान, हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर तापीवरील शेळगाव बॅरेजचेही तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून ८७०२ क्यूसेकने विसर्ग होत आहे. हतनूर धरणासह शेळगाव बॅरेजमधून एकाच वेळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर हतूनर व शेळगाव बॅरेजमधील विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जळगावला वाघूरमुळे दिलासा
अजिंठ्याच्या डोंगररागांमध्ये उगम पावणाऱ्या वाघूर नदीवर जिल्ह्यात उभारलेल्या धरणावरून जळगाव शहराला पाणी पुरवठा होतो. २४८.५५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणात सद्यःस्थितीत १६०.८५ दशलक्ष घनमीटर (६४.७१ टक्के) उपयुक्त पाणी साठा आहे. गेल्या काही वर्षात एकदाही वाघूरने तळ गाठलेला नाही. यंदा धरण परिसरात अजुनही चांगला दमदार पाऊस पडलेला नाही. मात्र, पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे वाघूरची पाणी पातळी बऱ्यापैकी वाढण्यास हातभार लागलेला आहे.