जळगाव – जिल्ह्यात किरकोळ कारणांवरुन गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून यावल तालुक्यात चिंचोली येथे बियर दिली नाही म्हणून एका हॉटेल मालकावर गुरूवारी रात्री गोळ्या झाडण्यात आल्या. मानेला गोळी लागल्याने हॉटेल मालक गंभीर जखमी असून, त्यांना जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रमोद श्रीराम बाविस्कर (५०) यांचे चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर रायबा नावाचे हॉटेल आहे. गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते हॉटेल बंद करून घरी जाण्यास निघाले होते. त्याचवेळी तिथे आलेल्या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांच्याकडे बियर मागितली. बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याने बियर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याचा राग आल्याने दुचाकीवरील एकाने बाविस्कर यांच्यावर गावठी बंदुक रोखली. आणि त्यांच्यावर अगदी जवळून काही गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी मानेला लागल्याने गंभीर जखमी झालेल्या बाविस्कर यांना त्यांच्या मुलाने लागलीच जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आडगाव फाट्यावर भेट दिली. पंचनामा पूर्ण करून पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही घटनास्थळी रात्री उशिरा भेट देऊन गोळीबाराच्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी यावल पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी सुरू केली. प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले. अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याने जिल्ह्यात गावठी बंदुकांमधून गोळीबार करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत.
एखाद्या किरकोळ गुंडाकडेही गावठी बंदूक आढळत असून त्याआधारे असे गुंड व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना दमबाजी करणे, लुबाडणे असे प्रकार करीत आहेत. पाचोरा येथेही आठ दिवसांपूर्वी एका तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता यावल तालुक्यात गोळीबाराचा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भर रस्त्यावर तसेच वर्दळीच्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सत्ताधारी महायुतीचे मंत्री, लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या विषयावर मूग गिळून असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.