जळगाव : येथील जैन इरिगेशनचा संघ मुंबई फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत अंतिम विजेता ठरला आहे. यंदा पहिल्यांदा सहभागी झालेल्या संघाने संपूर्ण स्पर्धेत विक्रमी ३० गोल केले. या विजयामुळे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘एलिट लिग’ स्पर्धेसाठी संघ आता पात्र ठरला आहे. बेस्ट मिड फिल्डर अभंग जैन आणि बेस्ट स्कोरर म्हणून आकाश कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.
बांद्रा येथे नॅव्हील डिसूजा मैदानावर मुंबई फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेचा अंतिम सामना झाला. संपूर्ण स्पर्धेत कॉर्पोरेट क्षेत्रातील १६ संघांनी सहभाग घेतला. ‘अ’ आणि ‘ब’ गटामध्ये सदरची स्पर्धा झाली. त्यात जळगावमधील जैन इरिगेशनचा फुटबॉल संघही सहभागी झाला होता. लीग पद्धतीने खेळण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्याच सामन्यापासून जैन इरिगेशनच्या संघाने आघाडी घेतली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया, नेव्हल डॉकयार्ड, सॅब केमिकल, एचडीएफसी, मध्य रेल्वे, टेली परफॉर्मन्स, जी.एम.पोलीस या मातब्बर संघाविरूद्ध ३० गोल जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी केले. प्ले ऑफच्या लढतीत जैन इरिगेशनने मध्य रेल्वेचा २-१ ने पराभव केला.
दुसऱ्या प्ले ऑफच्या लढतीत टेली परफॉर्मन्सला २-० ने नमवून अंतिम सामन्यात जी.एम.पोलीस संघाशी जैन इरिगेशनची थेट लढत झाली. कौशिक पांचाळ याने पहिला गोल दोन मिनिटात, तर दुसरा गोल तीन मिनिटात केला. याशिवाय, फवाझ अहमद याने पहिल्या हाफमध्ये तिसरा गोल केला. अभंग जैन याने लागलीच १८ व्या मिनिटाला चौथा गोल करून जी.एम.पोलीस यांना आव्हान दिले. त्यात कौशल पांचाळ याने शेवटचा गोल करून हॅट्रीक साधली. जैन इरिगेशनच्या संघाने जी.एम.पोलीस संघावर अखेर ५-१ ने एकतर्फी विजय मिळविला.
पहिल्या सामन्यापासून प्रथम स्थानावर राहिल्याने जैन इरिगेशनचा संघ अंतिम विजेता ठरला. आक्रमक शैलीचा वापर करत खेळलेल्या जैन इरिगेशनच्या फुटबॉलपटूंनी स्पर्धेत आपली वेगळी छाप सोडली. एकूण आठ सामन्यांमध्ये जैन इरिगेशनकडून आकाश कांबळे याने सात, कौशिक पांचाळ याने सात, अभंग जैन याने पाच, फवाज अहमद याने तीन, मोईझ अकमल याने दोन, यश सहानी याने तीन, अरशद शेख याने दोन, रोहित फतियाल याने एक गोल केला. मुख्य संघ प्रशिक्षक म्हणून अब्दुल मोहसीन काम पाहिले. फुटबॉल संघाच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन यांच्यासह अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी खेळाडुंचे कौतूक केले.