जळगाव : जिल्ह्यात नगरसेवकपदाच्या ४६४ जागांसाठी तब्बल ३८३५, तर नगराध्यक्षपदाच्या १८ जागांसाठी २४२ उमेदवारांनी सोमवार अखेर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी छाननीची प्रक्रिया पार पडली असता, नगराध्यक्षपदाचे ६८ आणि नगरसेवकपदाचे १३०० पेक्षा अधिक अर्ज अवैध ठरल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच दिसून आली. महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (शरद पवार गट, ठाकरे गट, काँग्रेस) यांच्या नेत्यांनी युतीधर्म निभावण्याचा प्रयत्न केला खरा, पण अनेक ठिकाणी तो सफल झाला नाही. महायुतीत काही अपवादात्मक ठिकाणीच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची युती झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदे गटाने चक्क महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट तसेच ठाकरे गटाशी हात मिळवणी केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी सरळ लढतीऐवजी चौरंगी लढतीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये, आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगावमध्ये तसेच पाचोऱ्यात भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. एकंदरीत, विविध आघाड्यांमधील अनपेक्षित युत्या आणि जागावाटपातील तिढा, यामुळे यंदा जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची आणि लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नगराध्यक्षपदासाठी जामनेरमध्ये भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन, भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे, चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण आणि माजी आमदार दिवंगत राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख, पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील आणि भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सौभाग्यवती सुचेता पाटील, मुक्ताईनगरात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यात एकूण १८ ठिकाणी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात भुसावळसह अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा मिळून एकूण १६ नगर परिषदांचा तसेच शेंदुर्णी आणि मुक्ताईनगर नगर पंचायतींचा समावेश आहे. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अर्जांमुळे जिल्ह्यातील नगर परिषदांची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी मुदतीत दाखल झालेल्या अर्जांची ठिकठिकाणी छाननी करण्यात आली. त्यानुसार, नगराध्यक्षपदाचे ६८ आणि नगरसेवकांचे १३४८ पेक्षा अधिक अर्ज अवैध ठरले. छाननीअंती नगराध्यक्षपदाचे १७४ अर्ज तर नगरसेवकपदाचे २४८७ अर्ज वैध ठरले. भुसावळ नगर परिषदेसाठी नगरसेवकपदासाठी ५३१ आणि नगराध्यक्षपदासाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत छाननीची प्रक्रिया सुरूच होती.
