जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (शरद पवार) दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदार अजित पवार गटात दाखल होऊन आता एक महिना होत आला आहे. असे असताना, नव्याने प्रवेश केलेल्यांपैकी गुलाबराव देवकर वगळता अन्य मातब्बर अजूनही अजित पवार गटात रूळलेले नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही ते लांबच आहेत. पक्षाचे नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जळगाव दौऱ्यावेळीही अनेकजण अनुपस्थितच होते.
जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यात महायुतीचे प्राबल्य असले, तरी भाजप आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) तुलनेत राष्ट्रवादीची (अजित पवार) स्थिती खूपच कमकुवत आहे. एकमेव अमळनेरमध्ये पक्षाचा आमदार असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन खाते मिळाले होते. ज्यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाचा चांगला दबदबा निर्माण झाला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पाटील यांना डावलण्यात आले.
अशा परिस्थितीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोठी खेळी खेळत अजित पवार गटाने शरद पवार गटाचे जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील आणि दिलीप सोनवणे यांच्यासारख्या मातब्बरांना गळाला लावले. संबंधित दिग्गजांच्या प्रवेशानंतर महायुतीत अजित पवार गटाचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नव्याने प्रवेश केलेल्या मातब्बरांपैकी माजी मंत्री देवकर यांनी वैयक्तिक जळगाव ग्रामीण मतदारसंघात संपर्क वाढवून अजित पवार गटाच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पक्षाचे नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सुद्धा ते दिवसभर होते. मंत्री पाटील यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून देवकर यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रसिद्धीवर बऱ्यापैकी खर्चही केला. पक्षाचे नेते जिल्ह्यात आलेले असताना, अजित पवार गटात नव्याने दाखल झालेले माजी मंत्री डॉ. पाटील, माजी आमदार पाटील व सोनवणे हे मात्र कुठेच दिसले नाही.
हाउसिंग फायनान्सची मुंबईत गुरूवारी महत्वाची बैठक असल्याने मी अजित पवार गटाचे नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहु शकलो नाही. मात्र, आदल्या दिवशी जळगाव मुक्कामी असताना त्यांची भेट घेतली होती. – डॉ. सतीश पाटील (नेते, राष्ट्रवादी- अजित पवार गट, जळगाव)