जळगाव : शहरातील अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर बाह्यवळण महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतीक्षीत असा हा मार्ग नुकताच वाहतुकीस खुला झाला असताना, गेल्या आठवड्यात दोन मालमोटारींची धडक होऊन दोन जण चालकांचा जागीच मृत्यू झाला होता. पाळधीजवळ रविवारी रात्री उशिरा पुन्हा दुसरा अपघात होऊन दोन चालक गंभीर जखमी झाले.

पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावर सध्या एका बाजुने प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अवजड आणि हलक्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने वेगाची मर्यादा घालून दिली आहे. त्या संदर्भात सूचना देणारे फलक देखील बाह्यवळण महामार्गावर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. दरम्यान, बाह्यवळण महामार्गाचे बरेच काम अद्याप शिल्लक आहे. परिणामी, सध्या एकाच बाजुने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जो पर्यंत दोन्ही बाजुने वाहतूक सुरू होत नाही, तोपर्यंत अवजड वाहनांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने केले आहे. प्रत्यक्षात त्यानंतरही मालमोटारी सुसाट धावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या बुधवारी कोळशाने भरलेली मालमोटार आणि दुसऱ्या बाजुने भरधाव आलेली टाईल्सने भरलेली मालमोटार यांची समोरासमोर धडक झाली होती. कॅबिनचा पार चुराडा झाल्याने दोन्ही मालमोटारीच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला होता.

रविवारी रात्री पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावर पाळधी गावाजवळ एक नादुरूस्त मालमोटार उभी होती. साधारण १०.४५ च्या सुमारास तरसोदकडून पाळधीकडे आलेली दुसरी भरधाव मालमोटार नादुरूस्त मालमोटारला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याच वेळी तिने समोरून जळगावकडे जात असलेल्या टँकरला धडक दिली. एकाच वेळी तीन अवजड वाहनांचा अपघात झाल्याने बाह्यवळण महामार्गावरील वाहतूक जवळपास पाऊण तास ठप्प झाली. अपघातात मालमोटार चालक सोनुकुमार गिरी (रा. उत्तर प्रदेश) आणि टँकरचा चालक गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना पोलिसांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

तीन अवजड वाहनांचा अपघात झाल्यानंतर ठप्प झालेली बाह्यवळण महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाळधी दूरक्षेत्र पोलीस केंद्रातील सहाय्यक निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी क्रेन मागवली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. महामार्ग पोलीस अभिलाष सुर्यवंशी, दीपक सुरवाडे, सुनील नाईक यांनीही ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत मदत केली. जवळपास ४५ मिनिटे ठप्प असलेली वाहतूक मध्यरात्री सुरळीत झाल्याने वाहन धारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, एकाच आठवड्यात दोन वेळा मोठे अपघात घडल्याने पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गाच्या लगतच्या गावांमधून चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही बाजुने वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलीस नेमण्याची मागणीही करण्यात आली आहे.