जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना अमली पदार्थ प्रकरणातील गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस दलात कार्यरत असताना कोणाशी संपर्कात राहावे, याचे भान न राखल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी अमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यात फरार असलेल्या अरबाज नावाच्या संशयित आरोपीशी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून तब्बल २५२ वेळा संपर्क साधून संभाषण केल्याचे उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. तसेच, प्राथमिक चौकशीसाठी भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, पोटे यांचा अमली पदार्थ प्रकरणातील गुन्हेगारांशी थेट संबंध अद्याप स्पष्ट झालेला नसून, त्यांच्या संभाषणातूनही आक्षेपार्ह काही आढळले नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा, पोलीस दलाच्या शिस्तीचे पालन न केल्यामुळे आणि त्यांचा गंभीर गुन्ह्यातील संशयिताशी इतक्या वेळा संपर्क झाल्यामुळे निलंबनाची कारवाई झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आगामी काळात केली जाणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्याबरोबरच अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून हप्ता वसुली केल्याचे आढळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताच धाक न राहिल्याने जळगाव जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी सर्रास गुन्हेगारांशी लागेबांधे ठेवून हप्तेखोरी करत असल्याने एकूणच पोलीस दलाच्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. मात्र, उशिरा का होईना पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे पाऊल उचलल्याने त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.