जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपसह शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आधीच कंबर कसली असताना, राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसनेही जळगावमध्ये मेळावा घेतला. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा अजित पवार येणार असल्याने या मेळाव्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात खुर्च्या जास्त आणि कार्यकर्ते कमी, अशी अवस्था दिसून आल्याने हा मेळावा वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरला.

विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ मतदारसंघात महायुतीने यश मिळवले असले, तरी भाजपसह शिंदे सेनेचे जास्त सदस्य निवडून आले आहेत. एकमेव अमळनेरमध्ये अजित पवार गटाचा आमदार आहे. अशा स्थितीत, जळगावमध्ये पक्ष वाढवण्यासाठी अजित पवार गटाने विधानसभेच्या निवडणुकीपासूनच जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत.

शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील तसेच भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांचा तीव्र विरोध असतानाही शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह डॉ. सतीश पाटील तसेच माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांना अजित पवार गटाने आपल्या पक्षात घेतले आहे. तेवढ्यावरच न थांबता रविवारच्या मेळाव्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष भगतसिंग पाटील यांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला.

अजित पवार गटातर्फे जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर समृद्ध खान्देश संकल्प आणि पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह अनेक तोलामोलाचे नेते आणि पदाधिकारी त्याठिकाणी आवर्जून उपस्थित होते. परंतु, मेळाव्याच्या ठिकाणी जेवढी गर्दी अपेक्षित होती तेवढी गर्दी मात्र दिसून आली नाही.

मेळाव्याच्या आधी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाच्या नेत्यांनी लोकसंघर्ष मोर्चाचे १५ हजार आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते मिळून सुमारे २५ हजार लोक उपस्थित राहतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात, लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते बऱ्यापैकी जमल्याचे दिसूनही आले. मात्र, अजित पवार गटाचे कार्यकर्ते मेळाव्याकडे फार फिरकले नाहीत.

जळगावमधील पक्षाच्या मेळाव्यासाठी सुमारे २५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार, पक्षाकडून एका मुख्य डोमसह दोन्ही बाजुला स्वतंत्र दोन कापडी मंडपांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. परंतु, मुख्य डोम वगळता बाजुच्या दोन्ही मंडपातील खुर्च्या शेवटपर्यंत खालीच राहिल्या.

प्रतिभा शिंदे यांना मानणारा जिल्ह्यातील आदिवासी समुदाय मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहिल्याने किमान मुख्य डोम तरी भरलेला दिसत होता. अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रातील कार्यकर्त्यांची म्हणावी तशी गर्दी मेळाव्याच्या ठिकाणी होऊ शकली नाही. त्याबद्दल खुद्द अजित पवार यांनी नंतर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

जळगावमधील पक्षाच्या मेळाव्यास लोकसंघर्ष मोर्चाचे २० हजार आणि पक्षाचे पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते. बाजुच्या दोन्ही मंडपातील लोक पाणी पिण्यास गेल्याने बहुधा खुर्च्या रिकाम्या दिसत असतील. – योगेश देसले (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गट, जळगाव)