जळगाव – जिल्ह्याची शेती क्षेत्रासह महिलांचे सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये अलिकडे बरीच भरीव प्रगती झाली आहे. हीच गती कायम ठेवल्याने पुढील काही वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था २५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजवंदन शुकवारी सकाळी उत्साहात पार पडले. त्या प्रसंगी जिल्ह्याच्या प्रगतीचा लेखाजोखा पालकमंत्री पाटील यांनी मांडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी उपस्थित होते. चालू वर्षाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षीही ५३ कोटी ९५ लाख रुपयांची विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. हवामान आधारित फळपिक विमा योजना, ठिबक-तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.

वाघूर व हतनूरसह लघु-मध्यम प्रकल्पांतून शेतीला पाणीपुरवठा होत असून, भागपूर आणि पाडळसरे उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे हजारो हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे काम सुरू आहे. पीएम-कुसुम तसेच मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेत आतापर्यंत १७ हजार १६३ सौर पंप बसवण्यात आल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. राज्यातील पहिली बहिणाबाई मार्ट संकल्पना जळगावमध्ये यशस्वीपणे राबवली गेली. जिल्ह्यात सध्या ११ मार्ट सुरू आहेत. गेल्या वर्षी ३१ हजार महिला बचत गटांना ४३० कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले होते. यंदाचे एक हजार कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून जिल्ह्यात नवीन ८९ बस गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. तसेच, चोपडा आगारासाठी पाच आणि जळगाव आगारासाठी आठ ई-बस मिळाल्या आहेत. पुढील काळात १७१ ई-बस उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री, रमाई, शबरी, मोदी, पारधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनांमधून पावणेतीन लाख घरांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी एका लाख २२ हजार कुटुंबांना पक्के घर मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जळगावात नव्याने बांधलेल्या महिला व बालकल्याण भवनाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय, जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंक्षणेसह महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पोलीस सेवा, जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अनेक ग्रामपंचायती, महिला बचत गट, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे, स्मृति चिन्हे आणि रोख पारितोषिक देण्यात आली.