जळगाव : जिल्ह्यात दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदार तसेच इतर बऱ्याच तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसची मोठी हानी झाली आहे.अशा स्थितीत या पक्षाने सोमवारी संघटन बळकटीसाठी जळगाव जिल्हा कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले आहे. मोठ्या गळतीनंतर त्याठिकाणी नेमके कोण उपस्थित राहते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर केविलवाणी अवस्था झालेल्या शरद पवार गटाला प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या नेतृत्वाने वाऱ्यावर सोडून दिले होते. मधल्या काळात पक्ष निरीक्षकांच्या आढावा बैठका सोडल्या तर पक्षात सगळा आनंदी आनंदच होता. ओस पडलेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कोणीच फिरकत नव्हते. स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वेध लागल्यानंतर तरी पक्षाचे कार्यालय गजबजून जाईल, अशी आशा सामान्य कार्यकर्ते बाळगून होते.
प्रत्यक्षात,माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धक्का देत अजित पवार गटात प्रवेश केला. इतरही अनेकजण सोडचिठ्ठी देण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे शरद पवार गटाचे उरलेसुरले अवसान गळून पडले आहे. अडचणीच्या काळात पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे अनेक मातब्बर पक्ष सोडून गेल्याने शरद पवार गटाची मोठी हानी झाल्याची कबुली त्या पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनीही जाहीरपणे दिली आहे.
दरम्यान, माजी मंत्री देवकर यांच्यासह डॉ.पाटील यांच्यासह अनेक मातब्बर त्यांच्या समर्थकांसह अजित पवार गटात सामील झाले असले, तरी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या कन्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, उद्योजक श्रीराम पाटील आदी बरेच दिग्गज अद्याप शरद पवार गटात आहेत. त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या जळगावमधील जिल्हा बैठकीत गळतीनंतर डागडुजी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तालुकास्तरावर नवीन नियुक्त्या करून थांबलेल्या निष्ठावानांना बळ देण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची तयारी करण्याचे नियोजन व चर्चाही केली जाणार आहे. पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे यांची विशेष उपस्थिती त्याठिकाणी असणार आहे.