जळगाव : कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायकासह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर गुरूवारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी असलेल्या महिलेला पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही प्रकरणांमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, त्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या संशयितांमध्ये प्रशांत सुभाष ठाकूर (४९) आणि संजय प्रभाकर दलाल (५८) यांचा समावेश आहे. एका तक्रारदाराने त्यांच्या गावातील ग्रामपंचायत व सदस्यांविरुद्ध सुरू असलेल्या अतिक्रमण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.

मात्र, कागदपत्रे मिळविताना त्यांना अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. या दरम्यान, त्यांची भेट अभिलेख शाखेतील सहायक महसूल अधिकारी प्रशांत ठाकूर आणि कार्यालयात नियमितपणे वावरणारा खाजगी एजंट संजय दलाल याच्याशी झाली. संबंधितांनी कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. आधीच सततच्या त्रासाने त्रस्त असलेल्या तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्याबद्दल तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचल्यावर प्रशांत ठाकूर आणि संजय दलाल यांना लाच घेताना पकडण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनील भागवत (३८) यांना गुरूवारी तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ज्ञ तथा प्रभारी अधीक्षक या पदावर जळगावमधील शासकीय दिव्यांग समिश्र केंद्राच्या कार्यालयात कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेतील दिव्यांग विभागात गेल्यानंतर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत यांची भेट त्यांनी घेतली.

त्यावेळी तक्रारदाराच्या जूनच्या पगार देयकामध्ये कोणतीच त्रुटी न काढता सह्या करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात १२ हजार रूपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याबाबतची लेखी तक्रार दिली. त्यानुसार, लाचेची पडताळणी केली असता माधुरी भागवत यांनी १० हजार रूपये लाचेची मागणी केली. प्रत्यक्षात तडजोडीअंती प्रथम हफ्ता म्हणून पाच हजार स्वीकारून उर्वरित पाच हजार रुपये रक्कम इतर देयके निघाल्यावर देण्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सापळा पथकातील चालक सुरेश पाटील, शैला धनगर, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी ही कारवाई यशस्वी केली.