जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारात सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, बुधवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ११३३ रूपये आणि चांदीच्या दरात प्रति किलो २०६० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली होती. दरवाढीनंतर विशेषतः चांदीने एक लाख २० हजार ५१० रूपयांचा नवीन उच्चांकही गाठला होता. मात्र, गुरूवारी सकाळी दोन्ही धातुंच्या किमतीत मोठी घट झाल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांना दिलासा मिळाला.
जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी २०६० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदीचे दर प्रति किलो एक २० हजार ५१० रूपयांवर जाऊन पोहोचले. गुरूवारी गुरूपुष्यामृताचा योग असल्याने सोने व चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, सकाळी बाजार उघडताच २०६० रूपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदी प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत खाली आली. अशाच प्रकारे मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख दोन हजार ६९१ रूपयांपर्यंत होते. बुधवारी ११३३ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोने एक लाख तीन हजार ८२४ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. गुरूवारी सकाळी मात्र १३३९ रूपयांनी दर कमी होऊन सोने प्रति १० ग्रॅम एक लाख दोन हजार ४८५ रूपयांपर्यंत खाली आले.
दरम्यान, सोने आणि चांदी दररोज नवीन उच्चांक निर्माण करत असल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. दर कमी झाल्याने मधल्या काळात सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहक थोडेफार तरी फिरकत होते. पुन्हा दरवाढ सुरू झाल्याने ग्राहक आणखी कमी होण्याची शक्यता बळावल्याने विशेषतः व्यावसायिकांमधून चिंता व्यक्त करण्यात आली. प्रत्यक्षात, गुरूवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंचे दर बऱ्यापैकी कमी झाल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांची चिंता काहीअंशी मिटली. मात्र, गुरूपुष्यामृताचा योग दुपारी पावणेपाच वाजेनंतर असल्याने सुवर्ण बाजारपेठेत सकाळी ग्राहकांची म्हणावी तशी वर्दळ दिसून आली नाही. गुरूपुष्यामृताच्या दिवशी नेमकी अमावस्या असल्यामुळेही सोने व चांदीच्या खरेदीला फार प्रतिसाद नसल्याचे काही सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
जाणकारांच्या मते, सध्याच्या काळात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आलेली घसरण ही दीर्घकालीन गुंतवणूकासाठी एक चांगली संधी ठरू शकते. दीर्घ मुदतीच्या सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या घसरणीचा लाभ घेत हळूहळू खरेदी करण्यास सुरुवात करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र, बाजारातील अस्थिरतेचा विचार करता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे ही अधिक सुरक्षित आणि शहाणपणाची भूमिका ठरू शकते.