scorecardresearch

Jindal Fire Accident नाशिक: अग्नितांडव घडलेल्या जिंदाल कंपनीत आढळला बेपत्ता कामगाराचा मृतदेह, मृतांचा आकडा तीनवर

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू तर १९ जण जखमी झाले.

Jindal Fire Accident नाशिक: अग्नितांडव घडलेल्या जिंदाल कंपनीत आढळला बेपत्ता कामगाराचा मृतदेह, मृतांचा आकडा तीनवर
जिंदाल पॉलिफिम्स कंपनी (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

नाशिक – मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिम्स कंपनीत आगीच्या घटनेनंतर बेपत्ता असणाऱ्या एका कामगाराचा मृतदेह बुधवारी सकाळी ढिगाऱ्याखाली मिळाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीन झाली आहे. दुर्घटना घडली, तेव्हा कारखान्यात १९८ कामगार होते, अशी माहिती व्यवस्थापनाकडून दिली गेली. त्यातील जखमी आणि मृत वगळता उर्वरित कामगार संपर्कात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, व्यवस्थापनाच्या दाव्यावर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून त्याची उलट पडताळणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> Jindal fire accident: जिंदालमधील ८३ कामगार संपर्कहीन असल्याची तक्रार

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू तर १९ जण जखमी झाले. दुसऱ्या दिवशी कमलाकर मिश्रा या युवकाने आपला भाऊ सुधीर मिश्रा (मूळचा प्रयागराज, उत्तरप्रदेश) बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. आगीची धग कायम असल्याने दोन दिवस पथकांना घटनास्थळी पोहोचता आले नाही. त्यामुळे बेपत्ता कामगारांचा शोध लागला नव्हता. या काळात प्रशासनाने संबंधितासोबत काम करणाऱ्यांकडून माहिती मिळवली. संबंधित बेपत्ता कामगार कुठल्या भागात असेल, याचा अंदाज बांधून बुधवारी त्या भागात पथकांनी कसाबसा प्रवेश मिळवला. त्यावेळी सुधीर मिश्रा याचा मृतदेह ढिगाऱ्याखाली दबलेल्या अवस्थेत मिळाला. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली. कारखान्यातील आग बऱ्यापैकी शमली असली तरी संपूर्ण घटनास्थळी पडताळणी करणे शक्य झालेले नाही. या भागात मोठ्या प्रमाणात रासायनिक जळालेले, अर्धवट जळालेले साहित्य आहे. त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनावर टाकली गेली आहे. औद्योगिक सुरक्षा व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना हरकत दाखला घेईपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

हेही वाचा >>> नाशिक : जिंदाल कंपनीतील आग २४ तासानंतर नियंत्रणात; दुर्घटनेच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची समिती

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिंदालमधील ८३ कामगार अद्याप संपर्कहीन असल्याचा दावा केला होता. त्यानंतर प्रशासनाने लागलीच मदतवाहिनी कार्यान्वित करीत कुणी बेपत्ता असल्यास नातेवाईकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले. मात्र, अद्याप नातेवाईक कुणी कामगार बेपत्ता असल्याची तक्रार करण्यास पुढे आलेले नाहीत

दुर्घटनेवेळी कारखान्यात १९८ कामगार

दुर्घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने स्वत:हून काही गोष्टी करणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नव्हते. आता प्रशासनाला जी माहिती मिळत आहे, ती व्यवस्थापनाकडून दिली जात आहे. रविवारी सकाळच्या सत्रात १९८ कामगार कारखान्यात काम करीत होते, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली. जखमी व मृत कामगार वगळता वगळता उर्वरित संपर्कात असल्याचे त्यांच्याकडून सांगितले गेले. त्यांच्या दाव्याची प्रशासन उलट तपासणी करीत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तुर्तास व्यवस्थापनाने दिलेली आकडेवारी आणि सद्यस्थिती ही संख्या जुळत आहे.

वरच्या माळ्यांवर मृतदेहांची शक्यता – मेंगाळ यांचा दावा

जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत सात ते आठ मजली इमारत आहे. त्या इमारतीतील चौथ्या, पाचव्या माळ्यावर अजून मृतदेह असू शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते काशिनाथ मेंगाळ यांनी केली आहे.

खासदार गोडसे यांच्याकडून पाहणी

जिंदाल पॉलीफिल्म्स कंपनीची बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी पाहणी केली. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला नसून थर्ममिनल रसायनच्या गॅस गळतीमुळे आग लागल्याचे उघड झाल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासदार गोडसे यांना दिली. तीन दिवसांपासून कार्यरत २० अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली असून बुधवारी केवळ तीन बंबांकडून उर्वरीत आग विझविण्याचे काम सुरू होते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 19:09 IST

संबंधित बातम्या