मालेगाव : मालेगावातील बनावट जन्मदाखले घोटाळा प्रकरण उघडकीस आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पुन्हा मालेगावला भेट दिली. राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या हे यापूर्वी देखील अनेकदा मालेगाव दौऱ्यावर येऊन गेले. त्यामुळे आताच्या भेटीत ते कोणता ‘बॉम्ब’ टाकणार याबद्दल लोकांमध्ये उत्कंठा होती. परंतु किरकोळ अपवाद वगळता सोमय्या यांनी मागचीच ‘टेप’ वाजविल्याचे दिसून आले.

शहरात ४ हजारावर अर्जदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विलंबाने जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून आदेश मिळवले. या आदेशांच्या आधारे महापालिकेकडून बोगस जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केली. अशी प्रमाणपत्रे प्राप्त करणारे बांगलादेशी वा रोहिंगे घुसखोर असल्याचा आरोप सोमय्या करीत आहेत. त्यांच्याच तक्रारीनंतर यासंदर्भात मालेगावात फसवणुकीचे वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. अशी प्रमाणपत्रे मिळविणाऱ्यांमध्ये बांगलादेशी व रोहिंगे घुसखोरांचा समावेश असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आणि नाशिकच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी ) या प्रकरणाची चौकशी करवून घेतली. मालेगावातील हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अन्य शहरातही अशाच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले. त्यानुसार राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मालेगावात आलेल्या सोमय्या यांनी महानगरपालिका व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर शहरातील ३९७७ प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. मालेगाव महानगरपालिकेने राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टलच्या नागरी नोंदणी प्रणालीवरून (सीआरएस) देखील त्यापैकी ३२७३ जणांचे जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेली जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करणाऱ्या लोकांचा भारतात जन्म झाल्यासंबंधी कोणताही ठावठिकाणा त्यामुळे लागत नाही,याचा सोमय्या यांनी पुनरुच्चार केला.

मालेगावात दाखल झालेल्या पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ८११ संशयीत आरोपी निष्पन्न झाले असून हा आकडा लवकरच एक हजारावर जाईल, असा दावा सोमय्या यांनी केला. तसेच रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्रांपैकी २२१४ प्रमाणपत्रे संबंधितांनी परत केले आहेत. ९४६ जण प्रमाणपत्रे परत न करता गायब झाले आहेत. त्यांच्या निवासाचा ठावठिकाणा लागत नाही. त्यामुळे ते कुठले आहेत,असा प्रश्न पडतो. या लोकांना फरार म्हणून घोषित करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. हा घोटाळा भारतातील सर्वात मोठा जन्म प्रमाणपत्र घोटाळा असून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित तो गंभीर मुद्दा असल्याने राज्यातील दहशतवादी विरोधी पथक तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा व केंद्रीय गुप्तचर खात्याने त्याचा तपास करावा,अशी आपली मागणी आहे. तसेच त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे विनंती करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले. याप्रसंगी भाजपचे महानगरप्रमुख देवा पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भुसे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष भाग्येश वैद्य, कायदा सेलचे शहराध्यक्ष योगेश निकम, हर्षल पवार,श्याम गांगुर्डे,मिलिंद भालेराव, दिलीप पाथरे, अमन परदेशी आदी उपस्थित होते.