नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये कोणत्याही विश्वस्तांची मुदत एकूण १० वर्षांपेक्षा अधिक असणार नाही, हे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्यासमोर तयार झालेल्या घटनेत स्पष्टपणे म्हटलेले आहे. परंतु, विश्वस्तपदाची ही कालमर्यादा संपूनही घटनेत उल्लेख नसलेल्या सल्लागार पदावर चार माजी विश्वस्त कार्यरत असल्याचा सभासदांचा आक्षेप आहे. या स्थितीत अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी कुसुमाग्रजांच्या काळापासून सल्लागार मंडळ असल्याचे नमूद केल्यामुळे विद्यमान सल्लागारांची प्रतिष्ठानवरील पकड अधिक मजबूत झाल्याचे अधोरेखीत झाले आहे.

तीन नवीन विश्वस्त नियुक्तीवरून कार्यवाह सुरेश भटेवरा आणि एक सल्लागार तसेच दोन विश्वस्तांमध्ये मतभेद झाले. सहमतीेने पुढे नेलेली विश्वस्त निवड प्रक्रिया नाकारून अविश्वास दाखविला गेल्याने भटेवरा यांनी कार्यवाह पदाचा दिलेला राजीनामा स्वीकारला गेला. सध्या प्रतिष्ठानमध्ये विलास लोणारी, मकरंद हिंगणे, लोकेश शेवडे आणि हेमंत टकले हे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या चारही जणांनी विश्वस्त म्हणून १० वर्षे काम केले आहे. प्रतिष्ठानच्या घटनेचा विचार करता संबंधितांची कालमर्यादा कधीच संपलेली आहे. सल्लागार पदाच्या माध्यमातून संबंधितांनी प्रतिष्ठानवर प्रदीर्घ काळापासून आपला प्रभाव कायम ठेवला. विश्वस्त मंडळाकडे सर्वाधिकार असताना सल्लागार कारभार करतात, सल्लागार घटनाबाह्य आहेत, असे अनेकांकडून आक्षेप घेतले जातात. सल्लागार अधिकृत की अनधिकृत यावर साहित्य वर्तुळात चर्चा झडत आहे.

या चर्चेवर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डहाके यांनी वेगवेगळे दाखले देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. कुसुमाग्रज प्रतिष्ठामध्ये सल्लागार मंडळाची परंपरा कुसुमाग्रजांच्या काळापासून आहे. पहिल्या जनस्थान पुरस्कारावेळी विधासभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी हे सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते. डाॅ. श्रीराम लागू, गोविंद तळवलकर यांसारख्या दिग्गजांनी प्रतिष्ठानमध्ये सल्लागार म्हणून काम केले आहे. सल्लागार मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यांचा प्रतिष्ठानच्या कामकाजात हस्तक्षेप नसतो, या अध्यक्षांच्या दाव्याने सल्लागारांची खुर्ची अधिक भक्कम झाल्याचे मानले जाते. अध्यक्षांनी पूर्वीच्या सल्लागार मंडळातील मान्यवरांची जी नावे कथन केली ती आणि विद्यमान सल्लागार यांच्यात जमीन-आसमानचे अंतर आहे. सल्लागारपदी काम करून ती मंडळी संस्थेच्या बाहेर पडली. परंतु, विद्यमान काही सल्लागार मात्र आजन्म या पदावर ठाण मांडून बसण्याचा मनोदय व्यक्त करतात. घटनाबाह्य पदाचे अध्यक्ष डहाके यांना समर्थन करावे लागणे यातच सल्लागारांचा प्रभाव सिद्ध होतो, याकडे काही सभासद लक्ष वेधतात.