नाशिक : रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून घाट माथ्यावरील भागात त्याचा जोर अधिक आहे. याच दरम्यान बुधवारी दुपारी मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवित वा वित्तहानी झाली नाही.
राज्यभर पावसाचा कहर सुरू असताना नाशिकमध्ये मागील दोन दिवस तो अगदीच रिमझिम स्वरुपात हजेरी लावत होता. पावसाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात येऊन रात्री त्याचे जोरदार पुनरागमन झाले. शहर परिसरात १२ तासांत ४४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. घाट माथ्यावरील भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. याच तालुक्यात कसारा घाट आहे. मुंबई-आ्ग्रा महामार्गावरील कसारा घाटात नवीन आणि जुना असे दोन स्वतंत्र मार्ग आहेत.
यातील नवीन घाट मार्ग नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी तर, जुना घाट मार्ग मुंबईहून नाशिकला येण्यासाठी वापरला जातो. जुन्या घाट मार्गावर जव्हार फाटा येथे बुधवारी दुपारी दरड कोसळली. मातीच्या भरावासह एक मोठा दगड खाली आला. सुदैवाने तेव्हा या ठिकाणी वाहने नव्हती. या घटनेची माहिती समजल्यानंतर टोल कंपनीचे पथक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जुन्या कसारा घाटातील मार्गावर दरड कोसळलेल्या भागात सुरक्षितेच्या दृष्टीने एका मार्गिकेवरून वाहतूक सुरळीत ठेवली गेली. मातीचा ढिगारा व दगड हटवून अडथळे दूर केले. अल्पावधीत हे काम पूर्णत्वास नेण्यात आले. या काळातही जुन्या कसारा घाटातील वाहतुकीत अडथळे आले नाही. ती एका मार्गिकेवरून सुरळीत ठेवण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांच्या घोटी केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी श्रीकांत ढगे यांनी कसारा घाटात दुपारी एक ते दीडच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडल्याचे सांगितले. दरडीचे स्वरुप लहान होते. तातडीने ढिगारा हटविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक संथ
याआधी पावसाळ्यात कसारा घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मुसळधार पाऊस व डोंगर दऱ्यात उतरणारे ढग यामुळे या भागात दृश्यमानता कमी असते. यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ होते. दिवसाही वाहनधारकांना दिवे लावून मार्गक्रमण करावे लागते. घाटात दरड कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून काही वर्षांपूर्वी डोंगरांवर संरक्षक जाळ्या देखील बसविण्यात आलेल्या आहेत.