नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संस्कृत ही भारतीयांची भाषा हवी होती. परंतु, ती प्रत्येकाला येईलच असे नाही. त्यामुळे संस्कृतप्रचूर हिंदीचा पर्याय स्वीकारला जात आहे, असे प्रतिपादन राजभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
येथील कुसुमाग्रज विचारमंचच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदेच्या समारोप सत्रात देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. श्रीपाद जोशी, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे उपस्थित होते.
यावेळी देशमुख यांनी, मराठी ही शीर्षस्थ भाषा करण्यासाठी पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन शिक्षण मराठीत व्हायला हवे, असे सांगितले. ग्रामीण भागातही मराठी आता लोप पावत आहे. इंग्रजी शाळा बंद होणार नाहीत. कारण, आजही यशाचा मार्ग म्हणजे इंग्रजी हे पालकांच्या मनात ठसले आहे. मराठी सक्तीमुळे ९० टक्के शाळांमध्ये मराठी शिकवली जात असली तरी शिकवण्यातील गुणवत्ता तपासायला हवी, असे देशमुख यांनी सांगितले. मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी काय करता येईल, याविषयी त्यांनी काही सूचना केल्या. अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती दुसरी परिषद पुण्याजवळील नारायणगाव येथे घेण्याचे ठरले. समारोप सत्रात काही ठराव संमत करण्यात आले.
यशवंतरावांसारख्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्षा
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे मुख्यमंत्री आजवर झालेले नाही. महाराष्ट्र आजही अशा मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेत आहे. महाराष्ट्र कसा अग्रेसर राहिल, यासाठी त्यांचे कायम प्रयत्न राहिल्याचे राजभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.
राजाश्रयाशिवाय परिषद यशस्वी
सत्कार किंवा मंत्र्यांशिवाय अशा परिषदा यशस्वी होऊ शकतात, हा पायंडा या साहित्य परिषदेने घातला आहे. राजाश्रयापेक्षा लोकाश्रयाने होणारी ही परिषद, संमेलन आहे. विद्रोही साहित्य संमेलनाचेही त्यामुळेच कौतुक वाटते. सध्या आपली साहित्य संमेलने कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत. ही संमेलने पर्यटनस्थ होत आहेत. मराठीला समर्पित असे कार्यकर्ते तयार नाहीत. अशा स्थितीत कोणाच्या खांद्यावर या चळवळी पुढे नेणार ? हिंदीला विरोध नाही. परंतु, पाचवीपर्यंत शिकवण्यास विरोध आहे. राजकारण्यांनी हिंदी -मराठी द्वेष निर्माण केला आहे.- श्रीपाद जोशी ( ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक)