जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा होताच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नेते मंडळी ही निवडणूक तुमची असून, तुमच्यासाठी आम्ही मेहनत घेऊ, अशी ग्वाही देत होते. मात्र, नगराध्यक्षांसारख्या महत्वाच्या पदांसाठी अनेक नेत्यांनी स्वतःच्या सौभाग्यवती, कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावला आहे. वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणाऱ्या कार्यकर्त्यांवर त्यामुळे पुन्हा एकदा सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, एकूण १८ ठिकाणी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात भुसावळसह अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा मिळून एकूण १६ नगर परिषदांचा तसेच शेंदुर्णी आणि मुक्ताईनगर नगरपंचायतींचा समावेश आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली असून, नगरसेवकांच्या ४६४ जागांसाठी तब्बल ३५४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या १८ जागांसाठी २२९ उमेदवारांनी अर्ज दाखल करून स्पर्धा चुरशीची होण्याचे संकेत दिले आहेत. भुसावळ नगरपरिषद क्षेत्रातील अखेरच्या दिवशी दाखल झालेल्या अर्जांची अधिकृत माहिती सोमवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. यामुळे भुसावळमधील अंतिम आकडेवारीची उत्सुकता कायम आहे.
मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अर्जांमुळे जिल्ह्यातील नगर परिषदांची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचाराची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी युती धर्म निभावण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. प्रत्यक्षात, अपवादात्मक परिस्थितीत भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाची युती झाली आहे. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार) तसेच शिंदे गटाने महाविकास आघाडीचे घटक पक्ष शरद पवार गटासह ठाकरे गटाशी हात मिळवणी केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगावमध्ये आणि पाचोऱ्यात भाजप स्वबळावर लढण्यासाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान, आपल्यासाठी लोकसभेसह विधानसभेत राबणाऱ्या कार्यकर्त्यांना साथ देण्याची वेळ आली असताना त्यांना पाडण्यासाठी आता प्रयत्न करावे का, असा प्रश्न शिवसेनेसह (एकनाथ शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला आहे. युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशी भीती शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनीही व्यक्त केली होती. एकूण चित्र लक्षात घेता नेत्यांच्या वक्तव्यांमधून कार्यकर्त्यांचे महत्व वारंवार अधोरेखित होताना दिसते होते. प्रत्यक्षात, नगराध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आल्यावर खासकरून महायुतीच्या सर्वच नेत्यांनी पत्ते ओपन करून आपल्या सौभाग्यवती, मुलगी तसेच इतर सदस्यांना पुढे केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोणी कुठे अर्ज दाखल केले ?
नगराध्यक्षपदासाठी जामनेरमध्ये भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन, भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे, चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण आणि माजी आमदार दिवंगत राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख, पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील आणि भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सौभाग्यवती सुचेता पाटील, मुक्ताईनगरात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
