नाशिक: सिन्नर परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले असताना नानेगाव शिवारातील पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला. वन विभागाच्या मदतीने त्यास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सोमवारी सायंकाळी नानेगाव शिवारातील दारणा नदी काठालगत असलेल्या पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत बछडा पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. नाशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी बचाव पथक सर्व साहित्यासह रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी पोहोचले. विहिरीच्या सभोवताली दगडी बुरुजांचे बांधकाम आहे. विहिरीवरील काही फळ्या बाजूला करून दोराच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. काही वेळ घेतल्यानंतर बछडा रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात आला.

नंतर पिंजरा विहिरीबाहेर काढून घेण्यात आला. बछड्यास म्हसरुळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात रवाना करण्यात आले. ही कामगिरी नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, प्रशांत खैरनार, यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. दरम्यान, सिन्नर तालुक्यात अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्यांचा वावर वाढला…

जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. मानवी वस्ती परिसरात बिबटे शिरकाव करीत असून त्यांच्या हल्ल्यात पशुधनासह बालकांसह ज्येष्ठ नागरिकही बळी पडत आहेत. वर्षभरात जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला असून अनेकांवर हल्ले झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील पांचाळे परिसरात ११ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे वन विभाग बिबट्यांपासून कशी सावधगिरी बाळगावी, याविषयी शिबिरातून प्रबोधन करण्यात करीत आहे. हे शिबीर सुरु असतांनाच बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर वन विभागाचे पथक तातडीने पांचाळे येथे पोहचले.

वन विभागाच्या वाहनातून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात जखमी सारंग थोरात या मुलास दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिबट्याला पकडण्यासाठी पाच पिंजरे लावण्यात आले असून थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेतला जात आहे. खंडागळी गावातील कडवा भागात याच घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिली. शिव बोस (सहा) हा आपल्या आजीबरोबर सोयाबीनच्या शेतातून फिरत असतांना बिबट्याने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला. आजी लंकाबाई यांनी सावधगिरी बाळगत आरडाओरड केली. शिव याचा हात धरून ठेवला. आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावल्याने बिबट्या पळून गेल्याने शिव बचावला.