नाशिक : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांचा गणवेश घालून फिरणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा दोनने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या तोतया पोलिसाची पत्नी पोलीस दलात कार्यरत असून तिनेच यासंदर्भात तक्रार दिली होती. संशयिताला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस दलात कार्यरत असलेल्या पत्नीचा गणवेश सागर पवार वापरत होता. खासगी नोकरीत असूनही बाहेर पडताना तो पत्नीचा पोलिसी गणवेश घालून फिरत होता. समाज माध्यमातही गणवेश घातलेले छायाचित्र टाकले. स्वत:च्या नावाची बनावट पाटीही त्याने तयार केली. या गणवेशाचा वापर करुन सार्वजनिक तसेच सरकारी कार्यालयामध्ये तो फसवणूक करत होता. हा प्रकार लक्षात आल्यावर पवारच्या पत्नीने त्याला जाब विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या पवारने पत्नीलाच मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडितेने पतीविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यापासून पवार हा फरार होता. अंबड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा दोन या गुन्ह्याचा तपास करीत असतांना संशयित खुटवड नगरातील साळुंखे नगरात राहत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखा दोनच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागल्यावर संशयित पळू लागला असता पोलिसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. संशयिताला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.