नाशिक : महायुतीतील उमेदवारीचा घोळ आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचे आठवडाभरात चार दौरे यामुळे चर्चेत राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक राहिली असून तीच निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे अशी मुख्य लढत आहे. ६०.७५ टक्के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत १.२७ टक्का वाढला.

हेही वाचा >>> कौल जनमताचा : वर्चस्वाच्या वाटेवर…

ठाकरे गटाचे वाजे हे आमदार असलेल्या सिन्नरमध्ये ४.५३ टक्के, काँग्रेसच्या ताब्यातील इगतपुरी-त्र्यंबकमध्ये ५.०२, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडील नाशिक रोड-देवळालीत ७.५६, भाजपच्या ताब्यातील नाशिक मध्य क्षेत्रात १.२८, नाशिक पूर्वमध्ये ०.२५ टक्के असे वाढीव मतदान झाले. भाजपचा आमदार असलेल्या नाशिक पश्चिममध्ये १.३६ टक्के मतदान कमी झाले. गोडसे यांच्या प्रचारात मित्रपक्ष फारसे सक्रिय नसल्याने अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार वेळा केलेले दौरे आणि रोड शो महत्त्वपूर्ण म्हणावे लागतील. भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने ओबीसी समाजाची नाराजी ठळकपणे दिसून आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोडसे यांचा इगतपुरी-त्र्यंबकव्यतिरिक्त भाजपशी संबंधित शहरी मतदारांवर तर, वाजे यांचा ग्रामीण भागावर अधिक भर राहिला. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचीही ग्रामीण भागावरच अधिक भिस्त राहिली. वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची तर, वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, सुषमा अंधारे, गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, रिपाइंचे नेते रामदास आठवले आदींच्या सभा झाल्या. मविआकडून बेरोजगारी, महागाई, कृषिमालाला कवडीमोल दर, नवीन उद्याोग आणण्याकडे दुर्लक्ष हे तर, महायुतीकडून राम मंदिर, अनुच्छेद ३७०, नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठीचे प्रयत्न हे मुद्दे प्रचारात मांडले गेले.