लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक – शाखाप्रमुख, केंद्रप्रमुख आणि शिवदूत हा त्रिसूत्री कार्यक्रम एकत्र राबवल्यास जनतेला चांगला संदेश देता येतो. त्यामुळे त्यांना ताकद देण्याचे काम शिवसेना करत असून पक्ष हा विचारांवर आधारित असतो. वारसदार दोन प्रकारचे असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विचारांचे आणि हिंदुत्वाचे वारसदार असून संजय राऊत यांनी या राज्यातील सर्व पक्षांचे वाटोळे केले आहे, असे टिकास्त्र खासदार हेमंत गोडसे यांनी सोडले.

शिवसेनेचे खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुका शिवसेना केंद्रप्रमुख आणि शाखाप्रमुख यांची आढावा बैठक घोटी येथे झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना गोडसे यांनी काँग्रेससोबत युती ही फक्त राऊत यांच्यामुळे झाली असून भाजपशीच नैसर्गिक युती असून आज आपण त्यांच्यासोबत आहोत, अशी भूमिका मांडली. अडीच वर्ष काँग्रेससोबत युतीत फक्त फरफट झाल्याचेही त्यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यातील ९० हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ५४ हजार हेक्टर क्षेत्र वेगवेगळ्या कारणांमुळे संपादित झाले असून अजून देखील औद्योगिक क्षेत्रासाठी जमिनी संपादित होत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त बांधवांना स्थानिक ठिकाणी त्यांना चांगला मोबदला व रोजगार कसा मिळेल, यासाठी शासन दरबारी प्रयत्न खासदार गोडसे प्रयत्न करणार असल्याचे मनोगत माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी व्यक्त केले. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार गोडसे यांच्या विजयासाठी सर्व शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहन तालुका प्रमुख संपत काळे यांनी केले.

आणखी वाचा-तुरीच्या आड गांजाची शेती, चोपडा तालुक्यात ३२ लाखांची झाडे हस्तगत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यासपीठावर खासदार गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी आमदार मेंगाळ, तालुकाप्रमुख काळे, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, माजी आमदार पांडुरंग गांगड, युवा सेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, महिला तालुका प्रमुख अनिता घारे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचा खासदार गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन इगतपुरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देविदास जाधव यांनी केले. कुंडलिक जमदडे यांनी आभार मानले.